चंद्रपूर, दि. 17 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 170 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 127 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्या बाधितामध्ये भामरागड, गडचिरोली, येथील 80 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 275 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 255, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 11, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 127 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 17 हजार 844 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 170 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 15 हजार 422 झाली आहे. सध्या 2 हजार 147 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 31 हजार 196 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 11 हजार 927 नमुने निगेटीव्ह आले आहे.
नागरिकांनी मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे