हल्ल्या घाटावरील अवैध रेती वाहतूकीवर भरारी पथकाचा छापा
चंद्रपूर, दि. 17 नोव्हेंबर: अवैध खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यात सन 2020-21 मध्ये आतापर्यंत एकूण 330 प्रकरणात रुपये तीन कोटी 58 हजार 480 दंड वसूल करण्यात येवून 13 व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात जिल्हा भरारी पथकाने एकूण 20 प्रकरणात रु. 23 लाख 680 तर जिल्ह्यातील सर्व तालुका भरारी पथकाने एकूण 310 प्रकरणात कार्यवाही करून रुपये 2 कोटी 77 लाख 57 हजार 800 दंड वसूल केला असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता जिल्ह्यात सभाव्य गौण खनिज चोरी होणाऱ्या ठिकाणी आकस्मित धाडी टाकून अवैध खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर व वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता -1966 च्या कलम 48 च्या तरतुदीअन्वये कार्यवाही करण्यात येते.
हल्ल्या घाटावरील अवैध रेती वाहतूकीवर भरारी पथकाचा छापा
दिनांक 17 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 7.00 वाजता जिल्हा खनिकर्म अधिकारी, खनिज विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथील जिल्हा भरारी पथकाने घुग्घुस तालुक्यातील नकोडा, चिंचोली, हल्ल्या व घोडा घाटावर भेट दिली. यावेळी हल्ल्या घाटावर पिंटू लोंळे रा. घुग्घुस यांच्या मालकीचे ट्रक्टर क्र. एमएच -34 एल-6310 द्वारे अवैध रेती वाहतूक करत असल्याचे आढळून आले. सदर ट्रक्टर जप्त करुन दंडात्मक कार्यवाही करण्यात येवून रुपये 1 लाख 10 हजार 900 दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात रेतीघाटातील अवैध उत्खनन व वाहतूकीवर उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांचे मार्फत नियंत्रण ठेवण्यात येते. वाळू/रेती निर्गती सुधारीत धोरण, 2018 नुसार अवैध उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता उपविभागीय स्तरावर उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधीत तहसिलदार, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा प्रतिनिधी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधीत तहसिलदार यांचा समावेश असलेली समिती गठीत केलेली आहे. तालुका स्तरावर तहसिलदार, उपअधिक्षक भूमी अभिलेख, गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, नायब तहसिलदार यांचा समावेश असलेली समिती गठीत केलेली आहे. तसेच ग्राम पातळीवर ग्राम पंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी यांचा समावेश असलेली समिती गठीत केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिली आहे.