अन्यथा ‘थंड पाणी’ चा व्यवसाय करणाऱ्यांवर होणार कारवाई !

अधिकृत परवाने व प्रमाणपत्र २४ तासात सादर करा !

व्यवसाय सिलबंद करण्याचे मनपा सहा. आयुक्तांचे आदेश !

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगर पालिका हद्दीत मागील काही वर्षांपासून बाटली, थंड पाण्याचे जार पुरवठा केल्या जात असून यासाठी लागणारी कोणतीच परवानगी, या व्यावसायिकांकडून घेण्यात आलेल्या नाहीत, शासनाच्या विविध विभागाचे परवानग्या काढण्यात आलेल्या नाहीत. विविध परवानग्यासह २४ तासाच्या आत मनपाला सादर कराव्या, अन्यथा थंड पाण्याचे जार/बाटली चे आस्थापना व काम करण्याचे ठिकाण तात्काळ सीलबंद करण्यात येणार असल्याचे आदेश शनिवार दि. ७ नोव्हेंबर २०२० रोजी मनपा कार्यालयाकडून काढण्यात आल्यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.

सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर शहर हद्दीमध्ये अनेक व्यावसायिक थंड पाण्याचे जार पोहोचविण्याचा उद्योग करीत आहे. या उद्योगासाठी केंद्रीय जल बोर्डाचे व्यवसाय चालविण्याचे प्रमाणपत्र तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकृत परवाना व इतर आवश्यक परवाने लागतात. मिळालेल्या माहितीनुसार अनेक व्यावसायिकांपाशी असे कोणतेही परवाने नसून ज्यांच्यापाशी असे परवाने आहेत, त्यांनी नोटीस मिळाल्याच्या २४ तासाच्या आत सदर परवाने मनपा कार्यालयात सादर करावे, परवाने नसल्यास जलशुद्धीकरण संयंत्र बंद करण्यात यावे, अन्यथा आस्थापना/ काम करण्याचे ठिकाण सिलबंद करण्यात येईल असे आदेश मनपा प्रशासनातर्फे काढण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या २८ ऑक्टोंबर २०२० रोजी एमपीसीबी/आरओसी/८९७/ २०२० च्या पत्रान्वये ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आहे. महत्वाचे म्हणजे शहरामध्ये अनेक ठिकाणी उच्च दाबाच्या बोरिंग खोदून शुद्ध पाण्याचा व्यवसाय सुरू आहे. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले होते, त्या प्रकरणाच्या निकालानंतर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने सदर कारवाईचे आदेश काढले असल्याचे सांगण्यात येत आहे. या आदेशामुळे पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here