वीज चोरी करत असाल तर सावधान ! चंद्रपुरात महावितरणने दिला मोठा दणका

चंद्रपूर: महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत वीज तारांवर आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या १ हजार १६१ आकडे बहाद्दरांना दणका देत त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात आली. कारवाईमुळे त्या-त्या भागातील वीज वाहिन्या आकडेमुक्त व भारमुक्त झाल्या असून यापुढेही ही कारवाई अशीच सुरु ठेवण्यात येणार आहे. चंद्रपूर मंडळातील चंद्रपूर, वरोरा व बल्लारशा तर गडचिरेाली मंडळातील गडचिरेाली, आलापल्ली व ब्रम्हपुरी विभागातील २१० कृषि व ९५१ अकृषि वीज चोरांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत असून वीजचोरीकरीता आकडयासाठी वापरण्यात येणारे साहित्य वायर, फ्यूज ई. साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सध्याची वाढती वीज मागणी व अपुरा पुरवठा यातील तूट भरून काढण्यासाठी महावितरणकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. वीज चोरांवर कारवाई हा त्याचा एक भाग असून वाढत्या वीज चोरीमुळे वीज हानी वाढून वीज यंत्रणेवर ताण येतो. वीज पुरवठा व मागणीचे गणित बिघडते. विजेच्या अनधिकृत वापराचा परिणाम वीज उपलब्धतेवर होऊन प्रामाणिक ग्राहकांना नाहक त्रास होतो. त्यामुळे अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहीत्राची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम राज्यभर राबविण्यात येत असून या मोहिमे अंतर्गत चंद्रपूर परिमंडलात आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या २१० कृषि व ९५१ अकृषि वीज चोरांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली. या सर्वांविरूध्द दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. कारवाई करण्यात आलेल्या आकडे बहाद्दरांवर करडी नजर ठेवत त्यांच्या परिसरात संध्याकाळी, रात्री व पहाटे अकस्मात भेटी देत तपासणी सुरु आहे.

चंद्रपूर मंडळातील २४ कृषि तर २६७ अकृषि वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली यात वरोरा विभागात सर्वाधिक २१ कृषि तर बल्लारशा विभागात सर्वाधिक २१२ अकृषि वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली. गडचिरोली मंडळातील १८६ कृषि व ६८४ अकृषि वीज चोरांविरुद्ध करवाई करण्यात आली. आलापल्ली विभागात सर्वाधिक कृषि ७०, गडचिरोली विभागात ६९ व ब्रम्हपुरी विभागात ४४ कृषि वीजचोरांवर कारवाई करण्यात आली तसेच आलापल्ली विभागात सर्वाधिक १२५ अकृषि, गडचिरोली विभागात ५६ व ब्रम्हपुरी विभागात ५ अकृषि वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

महावितरणचे मुख्य कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी तसेच प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर ग्रामीण मंडलच्या अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे, गडचिरोली मंडलचे अधीक्षक अभियंता रविंद्र गाडगे व चंद्रपूर, वरेारा, बल्लारशा, गडचिरोली, आलापल्ली व ब्रम्हपुरीचे कार्यकारी अभियंते व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांच्या विरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज वापर कराव, अनधिकृत वीज वापर करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येइल असे संकेत चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here