चंद्रपूर : काँग्रेस सेवादलाचे माजी प्रांत संघटक तथा सामाजिक कार्यकर्ते दलितमित्र श्री देवरावजी दुधलकर यांचे आज दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ६.१५ वा. चंद्रपूर येथे निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. काही दिवसांपासून ते आजारी होते. आपल्या राजकीय तथा सामाजिक जीवनात बालपणापासूनच त्यांनी निस्वार्थ व निरपेक्ष भावनेने काम केले. काँग्रेस सेवादलाचा खंदा व शिस्तबद्ध कार्यकर्ता अशी त्यांची देशभरात ओळख होती.
अतिशय सन्मानाचा समजला जाणाऱ्या सेवादलाच्या ‘नेहरू अवॉर्ड‘ ने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. १९७७ साली त्यांना महाराष्ट्र शासनाच्या दलितमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पंडित नेहरू, आचार्य विनोबा भावे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. ना. सू. हर्डीकर आदी थोरपुरुषासोबत त्यांनी कार्य केले होते.
देवरावजी दूधलकर यांची अंत्ययात्रा त्यांच्या एकोरी वार्ड येथील निवासस्थानाहून उद्या दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजता निघेल व अंत्यविधी मोक्षधाम बिनबा गेट, चंद्रपूर येथे संपन्न होईल.