राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी

२०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार

मुंबई, दि. ११- संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी २ मे पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी लागू होणार असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सोमवार दि. १३ जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय घेण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार याबाबतचे परिपत्रक शासनाने जारी केले आहे.

या निर्णयानुसार सोमवार दि. ०२ मे, २०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येणार आहे. सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. १२ जून, २०२२ पर्यंत ग्राह्य धरण्यात येऊन सन २०२२-२३ मध्ये पुढील शैक्षणिक वर्षात दुसरा सोमवार दि. १३ जून, २०२२ रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. २७ जून, २०२२ रोजी सुरू होतील.

इयत्ता पहिली ते नववी व ११ वी चा निकाल दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल. तथापि तो निकाल विद्यार्थी किंवा पालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहिल.

शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळ यासारख्या सणांच्याप्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांच्या परवानगीने घेता येईल. तथापि, माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्या ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) जी तारीख असेल त्या तारखेपासून शाळा सुरू होतील, असेही या परिपत्रकान्वये स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here