नियमांचे पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  

मुंबई, दि. १६ : कोरोनाविषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असेही श्री.ठाकरे म्हणाले. सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवतानाच मास्क वापरणे बंधनकारक आहे. जे नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, टास्क फोर्सचे सदस्य आदी उपस्थित होते.
जिल्ह्यांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट आल्याने नागरिकांमध्ये बेफीकीरी आली आहे त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठीच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. लोकांमध्ये जरी शिथिलता आली असली तरी यंत्रणांमध्ये ती येऊ देऊ नका. नियमांची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी  दिले.

राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आंदोलने, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये. विवाह समारंभामध्ये उपस्थितांच्या मर्यादेचे पालन केले जाते का याची यंत्रणेकडून तपासणी झाली पाहिजे. ज्या भागात रुग्ण संख्या वाढतेय तेथे कंटनेमेंट झोन करायची तयारी ठेवावी, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सर्वसामान्यांना लागू असून त्याला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना उपचारासाठी जी क्षेत्रिय रुग्णालये करण्यात आली आहे त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामीण आणि शहरी भागात सार्वजनिक ठिकाणांचे, शौचालयांचे, बसस्थानके, उद्याने याठिकाणी निर्जंतुकीकरणाचे काम हाती घ्यावे. नियमांचे पालन करायचे की पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे याची निवड लोकांच्या हातात आहे. त्यामुळे पुढच्या काळात अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यांना जो निधी देण्यात आला आहे त्यातील शिल्लक असलेला निधी ३१ मार्चपर्यंत वापरायला परवानगी देण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
जनारोग्य योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ देतानाच ज्या भागात जास्त रुग्ण आढळून येत आहेत तेथील सार्वजनिक कार्यक्रमांमधील गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची सूचना आरोग्यमंत्री. श्री. टोपे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here