चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना आजारावर सध्यातरी कोणतेही औषध उपलब्ध नसल्यामुळे प्लाझ्मा थेरपीव्दारे रुग्णांवर उपचार करून त्यांना आधार दिला जात आहे. त्यामुळे आपल्या कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्याकरिता पुढे येऊन प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.
कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी हि अनेक रुग्णांना वरदान ठरत आहे. या थेरपीत कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाचा रक्तातून काढलेल्या प्लाझ्मातील कोविड विरोधक अँटीबॉडी दुसऱ्या रुग्णाला दिल्या जातात. त्यामुळे रुग्णांना या आजारातून बाहेर काढणे काही प्रमाणात का, होईना शक्य आहे. मात्र प्लाझ्मा दान करण्यासाठी कोरोनातून बरे झालेले रुग्ण समोर येत नसल्यामुळे गंभीर रुग्णांवर याव्दारे उपचार करणे वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रश्न पडत असतो. एक प्लाझ्मा दानातून दोन रुग्ण बरे होऊ शकतात. त्यामुळे अधिकाधिक प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. जिल्हा सामान्य रुग्णपेटीत काही कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी समोर येऊन प्लाझ्मा दान केला आहे.
राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी रुग्णालयांना प्लाझ्मा थेरपी या उपचार पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागानेही तयारी सुरु केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्लाझ्मा डोनरने प्लाझ्मा दान करून आपले कर्तव्य बजावून कोरोना रुग्णांचे प्राण वाचवावे असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.
जनजागृती करा:
कोरोना आजारावर सध्यातरी कोणतीही लास उपलब्ध नाही. यासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र एक करून लास शोधण्याचे काम करीत आहेत. मात्र ती रुग्णापर्यंत केव्हा पोहचेल हे अद्यापही अस्पष्ट आहे. त्यामुळे कोरोनाच्या गंभीर रुग्णाला या आजारातून बाहेर काढण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत आहे. यासाठी आरोग्य विभाग त्यादृटीने प्रयत्न करीत असून मोठ्या प्रमाणात जनजागृती करून प्लाझ्मा डोनर ची संख्या वाढविण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.