चंद्रपूर दि.25 सप्टेंबर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात 25 सप्टेंबर शुकवार ते 1 ऑक्टोबर गुरुवार पर्यंत जनता संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.
या सात दिवसीय जनता संचारबंदीमध्ये सर्व रुग्णालय, औषधालय, कृषी केंद्र, बँका, शासकीय कार्यालय, तसेच एमआयडीसी मधील सर्व आस्थापना सुरु राहतील. दूध वितरण, पार्सल सुविधा, सर्व पेट्रोल पंप, वर्तमानपत्रांचे वितरण सुरू राहतील. सर्व किराणा, भाजी, फळे दुकाने, पान ठेले, चहा टपऱ्या, फुटपाथवरील दुकाने बंद ठेवण्यात येतील. नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
काेरोना संसर्गाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तपासण्या वाढविण्यात आल्यामुळे बाधित पुढे येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील उपलब्ध बेड संख्या तसेच ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यावर प्रशासनामार्फत भर देण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात पूर्णत: जनता संचारबंदीमुळे कोरोनाची साखळी तोडण्यास यश मिळेल त्यासोबतच जनतेने मास्क, सॅनीटायजर, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, स्वतःची सावधगिरी बाळगावी,प्रशासनाचे सहकार्य करावे,असे आवाहन देखील जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
जनता कर्फ्यूसाठी जनतेचे सहकार्य अतिशय आवश्यक आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पाॅज बटन दाबणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात जनता कर्फ्यू करण्यात येत आहे.