मुंबई: 28 ऑगस्ट
देशातील विविध भागांत असलेला ‘ताज हॉटेल्स ग्रुप’ आता अधिकृतपणे चंद्रपूर जिल्ह्यात येणार आहे. जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा येथील जमीन हस्तांतरण करण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि हॉटेल ताज यांच्यामध्ये गुरूवारी सामंजस्य करार करण्यात आला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्याकरिता मंजूरी दिली आहे.ताज समूहाची मे. इंडियन हॉटेल ही एक नामांकीत संस्था असून त्यांच्यामार्फत ताडोबामध्ये प्रथमच पंचतारांकीत प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
ताडोबा परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग आणि थ्रायव्हींग हॉटेल्स प्रा. लि. यांच्यामध्ये यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. याबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ताडोबातील वाघ, राज्यातील विविध समुद्रकिनारे, जंगल, गडकिल्ले हे राज्याचे भांडवल आहे. आपण जगासमोर हे चांगल्या पद्धतीने मांडले पाहीजे. पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढणे आवश्यक असून त्यासाठी राज्य सरकारमार्फत प्रोत्साहन दिले जाईल.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील आदी उपस्थित होते.