चंद्रपूर, दि.18 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 1165 आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 370 आहे. तर आतापर्यंत सुटी मिळालेले बाधित 784 आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. प्रत्येक गावांमध्ये चाचण्यांची संख्या वाढविण्याचे त्यांनी सांगितले. ऑक्सीमीटर तपासणी वाढविण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात परस्पर संपर्कातून रुग्ण तयार होत असून लक्षणे वाटणाऱ्या प्रत्येकाची अंटीजन टेस्ट व्हावी यासाठी, अतिरिक्त 30 हजार टेस्टिंग किट मागविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खासगी दवाखाने चालविणाऱ्या डॉक्टरांनी देखील लक्षणे आढळणाऱ्या सामान्य बाधितांना लगेच चाचणी करण्याचा सल्ला द्यावा, असे आवाहन केले आहे. चंद्रपूर शहरांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात जटपुरा वार्ड, येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळा, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ चाचणी सुरू आहे. तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात चाचणी सुरू आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत चाचणी उपलब्ध आहे. नागरिकांनी आता स्वतःहून पुढे येत लक्षणे वाटल्यास व सातत्याने ताप, सर्दी, खोकला असल्यास आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज पुढे आलेल्या बाधितामध्ये सर्वाधिक बाधित हे राजुरा येथील आहे. राजुरा शहरातील आंबेडकर वार्ड, अमराई वार्ड, तसेच तालुक्यातील टेंभुरवाही गावामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित आढळून आले असून या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याच्या अहवाल जिल्हा प्रशासनाने केले आहे. राजुरा शहर व तालुका मिळून एकूण 14 बाधित पुढे आले आहे.
त्यापाठोपाठ बल्लारपूर शहरातून 9 बाधित पुढे आले आहे. यामध्ये गणपती वार्ड, बालाजी वार्ड, रवींद्र नगर, या भागातील नागरिकांचा समावेश आहे. या परिसरातील नागरिकांनी देखील संपर्कातून बाधितांची संख्या वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. गरज नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
चंद्रपूर महानगरात देखील 7 बाधित आढळून आले आहे. तालुक्यातील वरवट तळोधी पोलीस लाईन, सावरकर नगर, दूध डेअरी या परिसरात रुग्ण पुढे आले आहेत . याशिवाय वरोरा (2) जीवती (5)घुगुस (1) चिमुर(3)मुल(1) सावली (1) या भागातून बाधित पुढे आले आहे.