चंद्रपूर, दि. 15 ऑगस्ट : येणाऱ्या काळात कोरोना आजाराचा आणखी उद्रेक जिल्ह्यात होऊ शकतो. यासाठी एकीकडे प्रशासकीय यंत्रणा नवनवीन वैद्यकीय उपाय योजनांसह तयार होत आहे. याच वेळी शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, कामगार यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत हळूहळू हा जीवनक्रम देखील गतीने कार्यशील होईल, याकडे शासन प्रशासनाचे लक्ष राहील, अशी ग्वाही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास, बहुजन कल्याण, खार जमीनी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिली.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी जिल्ह्यातील कोरोना लढ्यामध्ये जोखीम पत्करून काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील कोरोना योद्धयाचे विशेष प्रमाणपत्र देत सत्कार करण्यात आला.
आजच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाला आमदार किशोर जोगेवार, प्रकाश देवतळे अध्यक्ष जिल्हा काँग्रेस, रामू तिवारी अध्यक्ष शहर काँग्रेस, चित्राताई डांगे अध्यक्ष जिल्हा महिला काँग्रेस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
कोरोना सोबतची लढाई सुरू असताना शेतकरी, कामगार, विद्यार्थी व अन्य सर्व क्षेत्रातील यंत्रणा कमजोर पडू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना नंतर कोणत्या कोणत्या क्षेत्रांमध्ये गती देता येईल, याचा आम्ही अभ्यास करत असून त्यादृष्टीने वेगवेगळे प्रशिक्षण, ऑनलाइन रोजगार मेळावे, जिल्ह्यामध्ये कापूस उद्योजकांसाठी प्रशिक्षण केंद्र, मैत्री कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रात सवलतीच्या दरात जागा व अन्य सुविधा उपलब्ध करणे, जिल्ह्यातील किमान पाच हजार महिलांना रोजगार पुरविण्याचा कार्यक्रम हाती घेणे, रिक्त झालेल्या जागांना विशेष प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची भरती करणे, आदी विविध प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे अर्थचक्र सुरू राहील, शेतीमधील कामे नियमितपणे सुरू राहील, सामान्यातल्या सामान्य नागरिकांच्या आयुष्यामध्ये कोरोनामुळे व्यत्यय येणार नाही, यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री म्हणून त्यांनी या काळात केलेल्या कामकाजाची माहिती देखील आपल्या भाषणात सांगितली. आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून आपातकालीन यंत्रणा बळकट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून जिल्ह्यामध्ये लवकरच आपत्कालीन नियंत्रणासाठी स्वतंत्र संवर्ग तयार करण्यात येणार आहे. ही पदे भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसीच्या आपल्या लढ्याचा त्यांनी यावेळी उल्लेख करताना 19 टक्के आरक्षण करण्यासाठी राज्यस्तरावर उपसमिती गठीत केल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निधी मिळेल व त्यासाठी त्यांचे प्रवेश पडणार नाही याची काळजी घेत असल्याचे सांगितले. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सहा महिन्याची मुदतवाढ दिली असून ओबीसींसाठी महाज्योती या संस्थेची निर्मिती नागपुर येथे करण्यात आली आहे. बार्टी व सारथीच्या धर्तीवर हे संस्था काम करेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोरोना काळामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना 50 हजार शेतकऱ्यांना 320 कोटीची कर्जमाफी झाली आहे. पुनर्गठनामध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, त्यांना देखील लाभ लवकरच मिळेल असेही त्यांनी सांगितले. या वर्षी कापूस उत्पादकांना 1301 कोटी रुपये शासकीय खरेदीतून देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना कालावधीमध्ये लॉक डाऊनच्या काळात कोणीही उपाशी राहणार नाही, अशा पद्धतीचे अन्नधान्य वितरण जिल्ह्यामध्ये करण्यात आले. जिल्ह्यातील 4 लाख 46 हजार राशन कार्ड धारकांना अन्नधान्याचे वितरण करता आले. याशिवाय शिधापत्रिका नसणाऱ्या नागरिकांना देखील मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले. जिल्ह्यात या काळात 5 रुपयांमध्ये 3 लाख 48 हजार नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करता आली.
कोरोना संदर्भात विशेष प्रयोगशाळा स्थानिक खनिज निधीतून उभारल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाचणी सुरू आहे. याशिवाय खनिज विकास निधीतून 35 रुग्णवाहिका व एक अंत्यविधीसाठीची वाहिका आरोग्य विभागाच्या दिमतीला लवकरच येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत आठ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून या माध्यमातून जिल्ह्यातील दवाखान्याची नूतनीकरण, कृत्रिम ऑक्सिजन, कोवीड सेंटरला भोजन व्यवस्था, बाधितांना मूलभूत साहित्याची किट, डॉक्टर, नर्सेस साठी पीपीई अँटीजेन टेस्ट, आयुष्य औषध खरेदी, मजुरांना निवास भोजन व वाहतुकीची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी कोरोना काळामध्ये केलेल्या कामाचा गौरव केला. याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते,आदींच्या कार्याचाही गौरव केला.
याशिवाय आरोग्य यंत्रणेतील फ्रंटलाईन वैद्यकीय अधिकारी ज्यांनी प्रत्यक्ष कोरोना बाधितांवर उपचार केले. अशांचा देखील या वेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.