५ सप्टेंबरला शिक्षकदिनी होणार सत्कार
AISF वैद्यकीय समितीने केली निवड
चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. राजेंद्र सुरपाम यांना वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श वैद्यकीय प्राध्यापक महाराष्ट्र राज्य २०२२ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबरला शिक्षकदिनी संभाजीनगर (औरंगाबाद) येथील खुलताबाद येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. एआयएसएफ वैद्यकीय समितीने ही निवड केली आहे.
डॉ. राजेंद्र सुरपाम हे चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत. वैद्यकीय शिक्षणासोबतच सामाजिक क्षेत्रात ते आपले नेहमीच योगदान देत असतात. अत्यंत मनमिळावू आणि विद्यार्थीप्रिय असलेल्या डॉ. राजेंद्र सुरपाम यांच्या वैद्यकीय शिक्षण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत एआयएसएफ वैद्यकीय समितीने डॉ. सुरपाम यांची आदर्श वैद्यकीय प्राध्यापक पुरस्कारासाठी निवड केली आहे.
वैद्यकीय क्षेत्रात आदर्श वैद्यकीय प्राध्यापक हा मानाचा पुरस्कार समजला जातो. या पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती एआयएसएफ वैद्यकीय समितीचे राज्याध्यक्ष डॉ. अमोल जाधव यांनी कळविले आहे. डॉ. सुरपाम यांचे सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.