शास्त्रीनगर चौकीला पोलिस स्टेशनचा दर्जा द्या : आ. सुधीर मुनगंटीवार
मुंबई: चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिस स्टेशनचे विभाजन करुन शास्त्री नगर पोलिस चौकीला पोलिस स्टेशनचा दर्जा द्यावा व शहरात नवीन पोलिस स्टेशन निर्माण करावे अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली ; श्री फडणवीस यांनी तत्काळ निवेदनाची दखल घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन श्री मुनगंटीवार यांना दिले.
चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिस स्टेशनची हद्द खूप मोठी असल्याने तेथील पोलिस कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त भार येऊ लागला आहे. याचा परिणाम अप्रत्यक्षपणे कायदा आणि सुव्यवस्थेवर होत असल्याचे जाणवते आहे. विशेष म्हणजे यासाठी आवश्यक ९४ पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या अतिरीक्त पदांचा प्रस्ताव चंद्रपूर जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे.चंद्रपूर शहरातील २२ वॉर्ड आणि लगतची २१ गावे या पोलीस स्टेशनला जोडली जातील असा प्रस्तावही आहे.
सदर पोलिस स्टेशन करिता आवश्यक इमारत, जेथे सद्यस्थितीत चौकी आहे तेथेच उपलब्ध असल्याचे देखील शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. ५ऑक्टोबर २०१८ मध्ये तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षकांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना यासंदर्भात अहवाल सादर केला होता.
शास्त्रीनगर पोलिस स्टेशन ची निर्मिती ही या भागातील नागरिकांची आग्रही मागणी असून वाढत्या चंद्रपूर शहराची ती गरजदेखील बनली आहे. त्यामुळे तातडीने यासंदर्भात कार्यवाही करण्याची विनंती आ श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. संबंधितांना सूचना देण्याचे आश्वासन यावेळी श्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. श्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले.