४५ लाखांची शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील पहिला तरुण वकील
चंद्रपूर : विधायक कामाचा वसा घेतलेल्या दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातील ॲड.दीपक यादवराव चटप हा तरुण वकील ब्रिटिश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लिडर’ ठरला आहे. ब्रिटीश सरकारतर्फे देण्यात येणा-या ‘चेव्हेनिंग’ या जागतिक प्रतिष्ठेच्या ४५ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचा मानकरी झाला. अवघ्या २४ व्या वर्षी ही शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील तो पहिला तरुण वकील ठरला आहे. सामाजिक नेतृत्व करू इच्छिणाऱ्या जगभरातील युवकांना ब्रिटिश सरकारची ही शिष्यवृत्ती देते. लंडनच्या ‘सोएस’ या जगातील सर्वोत्तम विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी दीपकची निवड झाली. त्याच्या कामाची दखल घेत शिक्षणाच्या संपुर्ण खर्चाची जबाबदारी ब्रिटीश सरकारने घेतली आहे.
मूळचा आदिवासीबहुल दुर्गम अशा लखमापूर (ता.कोरपना, जि.चंद्रपूर) येथील रहिवासी असलेला दीपक ‘पाथ’ या सामाजिक संस्थेचा संस्थापक आहे. या माध्यमातून राज्यातील दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांना कायद्याने वाचा फोडण्याचे विधायक काम करत आहे. शेतकरी नेते ॲड.वामनराव चटप, पद्मश्री डॉ.अभय बंग, विधिज्ञ असीम सरोदे व तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत सामाजिक व विधिविषयक केलेले दीपकचे काम दखलपात्र ठरले.
दीपक हा यादवराव व हेमलता चटप या शेतकरी दाम्पत्याचा मुलगा आहे. कुटुंबातील विदेशात उच्च शिक्षण घेणारा पहिला तरुण! प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण गडचांदुर येथे पूर्ण केले. पुढे विद्येचे माहेरघर पुणे येथील नामांकित आयएलएस विधि महाविद्यालयातून कायद्याची पदविका प्रथम श्रेणीत मिळवली. शिक्षण घेताना मुंबई येथील अरबी समुद्रातील प्रदूषणाची याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दाखल केली. शेतकरी आत्महत्येविषयक मानवाधिकार आयोगात तक्रारी दिल्या. विधीमंडळ अधिवेशन काळात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दुर्गम भागातील प्रश्न सभागृहात मांडले. शेती व विधीविषयक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला. शिक्षणासाठी परदेशात जाण्याचं स्वप्न उराशी बाळगून प्रयत्न करणारा हा शेतकऱ्याचा पोरगा! मात्र, परदेशात शिक्षणासाठी लागणारा खर्च हा अवाक्याबाहेर होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनमिक्सला शिक्षण घेणारा मित्र प्रवीण निकम, लंडन विद्यापिठातील सोहेल भट्ट, भाऊ डॉ.जयदीप चटप यांनी दीपकला प्रेरणा दिली. राजू केंद्रे, अविनाश पोईनकर, बोधी रामटेके, वैष्णव इंगोले आदी मित्रांनी साथ दिली. त्यामुळे जिद्द आणि चिकाटी त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हती. दिपकने परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे पाहिलेले स्वप्न ब्रिटिश सरकारच्या या मानाच्या शिष्यवृत्तीने आता पूर्ण होणार आहे.
या कामामुळे झाली जागतिक दखल
• ‘लढण्याची वेळ आलीय’ हा काव्यसंग्रह वयाच्या १८ व्या वर्षी तर ‘कृषी कायदे: चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज’ हे दीपकने लिहीलेले पुस्तक चर्चेत राहीले.
• गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम कोलाम व माडिया समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर मानवाधिकार आयोग व उच्च न्यायालयात याचिका दाखल
• संविधानिक नैतिकता हा ऑनलाईन कोर्स तयार करून राज्यातील १२०० विद्यार्थ्यांना संविधानविषयक प्रशिक्षण दिले.
• कोरोना काळात सामाजिक संस्थांना सोबत घेऊन जवळपास १३०० कोलाम कुटुंबांना रेशन किट्स वितरण तर चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील कुपोषित बालकांना पोषण आहार किट्स देवून नवसंजीवनी दिली.
• कृषी न्यायाधिकरण कायद्याचे अशासकीय विधेयक तत्कालीन खासदार राजीव सातव यांनी २०१८ ला लोकसभेत मांडले. या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात दीपकची महत्वाची भूमिका.
• कोरो इंडिया फेलोशिपच्या माध्यमातून तळागळात मूलभूत संविधानिक हक्कांवर काम
• समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नावर मोफत वकीली, शेतकरी आंदोलनांत सक्रिय सहभाग
भारतात येणारा काळ शेतकरीपुत्रांचा व दुर्बल घटकांचा शेतकरी चळवळीने अन्यायाविरूद्ध बंड करायला शिकविले. लखमापुर ते लंडन हा आपला शैक्षणिक प्रवास ग्रामीण भागातील शेतकरी व दुर्बल घटकांतील पुत्रांना ऊर्जा देणारा ठरेल. जिल्हा परिषदेच्या शाळेपासून सुरू झालेलं आपलं शिक्षण लंडनच्या विद्यापीठापर्यंत मजल गाठता येणे हे आई – वडिल, भाऊ, काका व मित्रांनी दिलेली खंबीर साथ यामुळेच पूर्णत्वाकडे वाटचाल करणारे आहे. येणाऱ्या काळात शेतकरी व समाजातील दुर्बल घटकांतील तरुणांना उच्च शिक्षण घेत आपल्या समाजासाठी झटावे लागणार आहे. ब्रिटिश सरकारने दाखविलेला विश्वास मोलाचा असून उच्च शिक्षण घेतल्यानंतर भारतात परत येऊन शेतकरी, आदिवासी व दुर्बल घटकांसाठी रचनात्मक काम उभे करेल. भारतात येणारा काळ हा आमचा असेल.
– ॲड. दीपक चटप,
ब्रिटिश सरकार च्या ‘चेव्हेनिंग’ स्कॉलरशिपचा मानकरी