2 मे 2020 रोजी आढळला होता पहिला ॲक्टीव्ह रुग्ण
चंद्रपूर, दि. 7 एप्रिल : जिल्ह्यात कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी पहिल्यांदाच ॲक्टीव्ह रुग्णाची संख्या शुन्यावर आली आहे. 2 मे 2020 या दिवशी जिल्ह्यात पहिला ॲक्टीव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या अनेकदा शुन्यावर आली असली तरी ॲक्टीव्ह रुग्णाची नोंद मात्र कायम होती. जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्ण नाही, असा एकही दिवस दोन वर्षात गेला नाही. मात्र गुरुवार दि. 7 एप्रिल 2022 रोजी जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णाची संख्या निरंक नोंदविण्यात आली आहे. कोरोनाच्या या दोन वर्षाच्या कालावधी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाने कोरोनाविरुध्द अहोरात्र लढा दिला आहे.
जिल्ह्यात गुरुवारी (दि.7) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 960 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 393 झाली आहे. आतापर्यंत 8 लाख 96 हजार 90 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 95 हजार 890 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : जिल्ह्यात कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण निरंक असले तरी नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.