मिसेस इंडिया शिल्पा आडम यांची उपस्थिती
चंद्रपूर : जेसीआय चंद्रपूर गरिमाच्या वतीने ५ मार्चला शहरातील दिव्यांग महिलाश्रमातील दिव्यांगांसोबत जागतिक महिला दिन साजरा केला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला मिसेस इंडिया 2021सौ.शिल्पा आडम यांची विशेष उपस्थिती होती.
ज्ञानार्चना अपंगस्नेह बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरच्या वतीने जगन्नाथ बाबा नगर,रामनगर, परिसरात दिव्यांग महिलाश्रम चालविते जाते. स्वयंरोजगाराचे धडे देत त्यांना आत्मनिर्भर करण्याचे काम येथून सुरू आहे. आजघडीला अनेक दिव्यांग या ठिकाणी घरगुती उपयोगात येणाऱ्या अगरबत्ती, फिनाईल, धुपबत्ती, एप्रोन, चपाती कव्हर, वाती, कापूर, शु बॅग, लेडीज स्कार्फ, नाप्थोलिंन यासारख्या वस्तू तयार विक्री करीत आहेत. या दिव्यांग महिला, मुलींचे मनोबल वाढविण्याच्या उद्देशातून जेसीआय चंद्रपूर गरिमाने यावर्षी महिलादिन साजरा केला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने अर्चना मानलवार, जेसीआय चंद्रपूर गरिमाच्या अध्यक्ष जेसी जेएफएम निधी टंडन, सचिव जेसी गौरी लोढा, माजी अध्यक्ष जेसी डॉ. ऋजुता मुंधडा, प्रकल्प निदेशक जेसी स्मिता तिवारी, जेसी मनीषा पडगीलवार सह इतर सदस्यांची उपस्थिती होती.