नगरसेवक वसंत देशमुख,सतीश घोनमोडे यांच्यासह भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

चंद्रपूर महापालिकेतून भाजपच्या परतीचा प्रवास सुरु: ना.विजय वडेट्टीवार

चंद्रपूर : महापालिकेतील भाजपचे माजी गटनेते, सभागृह नेते वसंत देशमुख यांची शहरातील ओबीसी, बहुजन समाजाचा चेहरा अशी ओळख आहे. भिवापूर प्रभागातून ते चारवेळा विजयी झाले आहेत. केवळ भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उचलल्यामुळे भाजपने त्यांच्यावर अन्याय केला. वसंत देशमुख, नगरसेवक सतीश घोनमोडे यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला निश्चितच बळकटी मिळणार आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसचा मनपावर झेंडा फडकणार असून, मनपातील भाजपचा परतीचा प्रवास सुरु झाला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
शहरातील भिवापूर प्रभागातील मातानगर परिसरात आयोजित पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात पालकमंत्री वडेट्टीवार बोलत होते. यावेळी खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष नंदू खनके, मनपातील विरोधी पक्षनेता डॉ. सुरेश महाकुलकर, महिला काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्राताई डांगे, काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय नळे, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव नम्रता ठेमस्कर, माजी महापौर संगीता अमृतकर, माजी सभापती संतोष लहामगे, नगरसेवक प्रशांत दानव, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, राजेश अडूर, पप्पू सिद्दीकी, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, नौशाद शेख, सुधाकर चन्ने, सुरेश कापणे, विनोद तरारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी नगरसेवक वसंत देशमुख, नगरसेवक सतीश घोनमोडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी भिवापूर प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झालीत. भाजपने केवळ माझ्यावरच नव्हे, तर प्रभागातील जनतेवर अन्याय केला आहे. काँग्रेस हा मोठ्या मनाचा आणि विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची भावना वसंत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.
आयोजनासाठी दीपक गोरडवार यांच्यासह चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

महापालिकेत परिवर्तन होईल : खासदार बाळूभाऊ धानोरकर
महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मागील पाच वर्षांत अनेक भ्रष्टाचार केले आहेत. शहरातील जनता यांच्या कारभाराने कंटाळली आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निश्चितपणे परिवर्तन होणार असून काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here