दमदार खेळाचे प्रदर्शन करत 4 संघांची सेमीफायनलमध्ये धडक
चंद्रपूर: चंद्रपूर प्रीमियर लीग CPL टी 20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आठवे पर्व आता अंतिम सामन्याकडे प्रवास करत आहे. शहरातील लाईफ फाउंडेशन च्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्थानिक रामनगरच्या सेंट मायकेल शाळेच्या मैदानावर या स्पर्धेत 16 संघांचे प्रत्येकी 15 खेळाडू असे एकूण 240 खेळाडू विजेतेपदासाठी झुंजले. सामन्यांसाठी 4 महिने परिश्रम करून हिरवेगार मैदान खास तयार केले गेले होते. 10 फेब्रुवारी रोजी या क्रिकेट कार्निव्हलचा प्रारंभ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, सेंट मायकेल शाळेचे प्राचार्य श्री विकास कोल्हेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. गेले काही दिवस ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकण्यासाठी खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले. शुक्रवार 25 फेब्रुवारी रोजी स्पर्धेचे सेमिफायनल सामने खेळले जाणार आहेत. यात पहिल्या सामन्यात डायनॅमिक फायटर्स विरुद्ध थ्री एसेस असा मुकाबला होणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात ब्लॅक गोल्ड विरुद्ध भद्रावती ग्रेनेड्स असा खेळ बघायला मिळणार आहे. या 2 सामन्यातील विजयी संघ रविवार 27 फेब्रुवारी रोजी अंतिम लढतीसाठी पात्र होणार आहेत. यंदा स्पर्धेत मोठे उलटफेर बघायला मिळाले होते. मागील विजेते आणि उपविजेते संघ साखळी सामन्यात स्पर्धेतून बाद झाल्याने CPL स्पर्धेतील चुरस वाढली आहे. विजेत्या संघाला १ लाख ११ हजार १११ रु. व लखलखती ट्रॉफी दिली जाणार आहे. स्पर्धेच्या यशासाठी लाईफ फाउंडेशन चे अध्यक्ष संजय तुमराम, उपाध्यक्ष आरीफ खान, नाहीद सिद्दीकी ,सचिव सुनील रेड्डी, कोषाध्यक्ष बॉबी दीक्षित, सदस्य शैलेंद्र भोयर, डॉ. किशोर भट्टाचार्य, रईस काजी, आर्किटेक्ट वसीम शेख, कमल जोरा, प्रकाश सुर्वे, जितेंद्र मशारकर, आशीष अम्बाडे कार्यरत आहेत.