डायनॅमिक फायटर संघाने जिंकला स्पर्धेचा पहिला सामना
चंद्रपूर : चंद्रपूर प्रीमियर लीग CPL टी 20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा आज उत्साही प्रारंभ झाला. शहरातील लाईफ फाउंडेशन च्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा स्पर्धेचे आठवे पर्व आहे. स्थानिक रामनगरच्या सेंट मायकेल शाळा मैदानावर या स्पर्धेसाठी 4 महिने परिश्रम करून हिरवेगार मैदान खास तयार केले गेले आहे. 15 खेळाडूंचा समावेश असलेल्या 16 चमु यात सहभागी झाल्या आहेत. गुरुवारी सकाळी या क्रिकेट कार्निव्हलचा प्रारंभ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, सेंट मायकेल शाळेचे प्राचार्य श्री विकास कोल्हेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत लाईफ फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक श्री कुलकर्णी यांच्या हस्ते पीच पूजा करून नारळ फोडण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत दोन्ही संघांच्या खेळाडूंचा परिचय करून देण्यात आला. खेळभावनेचा जयजयकार करणारे फुगे पोलीस अधीक्षक श्री साळवे यांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आले. आपल्या शुभेच्छापर संबोधनातून पोलीस अधीक्षक श्री साळवे यांनी सर्व संघांनी पंच निर्णयाचा आदर राखून स्पर्धा सफल करण्याचे आवाहन केले. स्पर्धेला अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि प्राचार्य विकास कोल्हेकर यांनी आपले समयोचित मार्गदर्शन केले. पहिला सामना ‘चंद्रपूर पोलीस विरुद्ध डायनॅमिक फायटर्स’ यांच्यात खेळला गेला. पोलिस संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. डायनॅमिक फायटर संघाने 20 ओव्हर्स मध्ये 8 बाद 132 धावा केल्या. दुसऱ्या डावात पोलिस संघ 20 ओव्हर्समध्ये केवळ 106 धावात गारद झाला. अशा रीतीने डायनॅमिक फायटर्स संघाने प्रथम सामना खिशात टाकला. यानंतर उद्यापासून दररोज 2 लीग सामने खेळविले जाणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार 27 फेब्रुवारी रोजी खेळविला जाणार आहे. विजेत्या संघाला १ लाख ११ हजार १११ रु. व लखलखती ट्रॉफी दिली जाणार आहे. स्पर्धेच्या यशासाठी लाईफ फाउंडेशन चे अध्यक्ष संजय तुमराम, उपाध्यक्ष आरीफ खान, नाहीद सिद्दीकी ,सचिव सुनील रेड्डी, कोषाध्यक्ष बॉबी दीक्षित, सदस्य शैलेंद्र भोयर, डॉ. किशोर भट्टाचार्य, रईस काजी, आर्किटेक्ट वसीम शेख, कमल जोरा, प्रकाश सुर्वे, जितेंद्र मशारकर, आशीष अम्बाडे कार्यरत आहेत.