चंद्रपूर, दि. 4 फेब्रुवारी : वरोरा तालुक्यातील शेगाव हद्दीतील एका अल्पवयीन 17 वर्षीय मुलींचे,27 वर्षीय मुलांसोबत दि. 27 जानेवारी 2022 रोजी बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. बालविवाहाचे गांर्भीर्य लक्षात घेता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाईत यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथील समुपदेशिका प्रिया पिंपळशेंडे व सामाजिक कार्यकर्ता प्रतिभा मडावी यांनी शेगाव,पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. मेश्राम यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनचे व इतर कर्मचाऱ्यांसह बालविवाहास्थळी दाखल झाले व होणारा बालविवाह थांबविण्यात यश आले. अल्पवयीन बालीका व तिच्या पालकांना दि. 27 जानेवारी 2022 रोजी बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले. तसेच सदर बालविवाहाचे प्रकरण जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चंद्रपूर यांच्याकडे पुढील कार्यवाहीकरिता सोपविण्यात आले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, दीपक बानाईत यांचे मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्षातील समुपदेशिका यांच्यामार्फत अल्पवयीन मुलीचे व तीच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत अवगत करण्यात आले, आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असुन त्यावर असणाऱ्या शिक्षा व दंड याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी बालिकेच्या पालकांसह इतर नातेवाईकांनी अल्पवयीन मुलीचे 18 वर्ष पुर्ण झाल्याशिवाय तिचा विवाह करणार नाही याची हमी दिली. सदर प्रकरण पुढील कार्यवाहीकरीता बालकल्याण समिती, चंद्रपूर यांचेकडे सादर करण्यात आले. यावेळी शेगाव, पोलिस स्टेशनचे पोलीस शिपाई, सरपंच, उपसरपंच, जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथील समुपदेशिका प्रिया पिंपळशेंडे, सामाजिक कार्यकर्ता प्रतिभा मडावी यांनी हे प्रकरण यशस्वीरित्या हाताळले.
तसेच 20 जानेवारी 2022 रोजी पोंभूर्णा तालुक्यातील बालविवाह, चाईल्ड लाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व पोंभुर्णा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. कुकडे, श्री. जोशी यांच्या सहकार्याने बालविवाह थांबविण्यात आला.
जिल्हयात होत असलेल्या बालविवाहाची माहिती नागरिकांनी ग्राम, तालुका, प्रभाग व जिल्हा बाल संरक्षण समिती तसेच प्रत्येक गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांना द्यावी, किंवा गावातील पोलीस पाटील, जवळचे पोलिस स्टेशनला कळवावे तसेच चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाईत यांनी केले आहे.