चंद्रपूर, दि. 29 जानेवारी : बल्लारपूर रोडवर निर्माणाधीन असलेल्या कैंसर हॉस्पिटलची जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकतीच पाहणी करून बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, बांधकाम प्रकल्प अधिकारी वैभव गजभिये, लेखाधिकारी मयूर नंदा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, टाटा ट्रस्टच्या सहाकार्याने येथील कैंसर हॉस्पिटल उभे राहत असले तरी भविष्यात वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ आदी बाबतीत ते व्यवस्थित सुरू राहिले पाहिजे. आपल्या जवळच असलेल्या नागपुरात मोठमोठे कैंसर हॉस्पिटल आहेत. मात्र गरीब लोकांना तेवढा खर्च झेपवत नाही. त्यामुळे गरीब रुग्णांचा विचार करून या हॉस्पिटलमध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार होणे गरजेचे आहे. हे रुग्णालय संपूर्णपणे कार्यान्वित होण्यापूर्वी योग्यरीतीने चालविण्याकरीता आतापासून नियोजन करा. रुग्णालयासाठी लागणारा 40 कोटीचा प्रस्ताव त्वरीत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
चंद्रपुर येथे निर्माणाधीन असलेले कैंसर हॉस्पिटल 140 बेडेड असून 2 लक्ष 35 हजार चौरस फूटात त्याचे बांधकाम होणार आहे. रुग्णालयाची इमारत ही तळमजलासह पाच मजली राहणार आहे. खनिज विकास निधीतून आतापर्यंत 113 कोटी रुपये देण्यात आले आहे. जवळपास 50 टक्के काम पूर्ण झाले असून सिव्हिल वर्क वर 40 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती वैभव गजभिये यांनी दिली.