चंद्रपूर: मुख्यत्वे नापिक आणि अकृषिक जमिनीचा वापर करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ) केंद्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली. या योजनेद्वारे सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण होणारी वीज महावितरणला विकून अथवा सौर प्रकल्पासाठी जमिन भाडे पट्टीवर देऊन उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली.
याच योजनेच्या घटक ब अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 1 लाख सौरपंप वितरीत करण्याचे लक्ष आहे. या सौरपंप वितरीत करण्याच्या योजनेअंतर्गत अर्जदारांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेचे सौरपंप चंद्रपूर व गडचिरेाली जिल्हयातील 128 अर्जदारांना मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच अर्जदार शेतकरी बांधवांच्या शेतशिवारात सुर्याची किरणे या सौरपंपाच्या माध्यमातून खळखळणारे पाणी वाहून नेऊन काळया मातीची काळया आईची तृष्णा भागविणार असून, शेतीच्या समृध्दीचा प्रकाश पसरवित शेतकरी बांधवांची करुणा भागणार आहेत.
या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती करिता 3 एच. पी.चे 97 सौरपंप , 5 एच. पी. चे 48 सौरपंप , 7.5 एच. पी. चे 16 सौरपंप तर अनुसूचित जातीसाठी 3 एच. पी.चे 146 सौरपंप , 5 एच. पी. चे 73 सौरपंप 7.5 एच. पी. चे 24 सौरपंप तसेच खुल्या प्रवर्गासाठी 3 एच. पी.चे 835 सौरपंप, 5 एच. पी. चे 418 सौरपंप , 7.5 एच. पी.चे 139 सौरपंप असे एकूण 1796 सौर पंप वाटप करण्यात येतील.
तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जमाती करिता 3 एच. पी.चे 56 सौरपंप ,5 एच. पी. चे 28 सौरपंप , 7.5 एच. पी. चे 9 सौरपंप तर अनुसूचित जातीसाठी 3 एच. पी.चे 83 सौरपंप , 5 एच. पी. चे 42 सौरपंप , 7.5 एच. पी. चे 14 सौरपंप तथा खुल्या वर्गासाठी 3 एच. पी.चे 480 सौरपंप, 5 एच. पी. चे 240 सौरपंप , 7.5 एच. पी.चे 80 सौरपंप असे एकूण 1032 सौरपम्प वितरित करण्यात येतील.
या योजणेच्या घटक अ अंतर्गत ०.५ ते २ मे.वॅ. क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प प्राधान्याने शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आणि पाणी वापरकर्ता संघटना (डब्ल्यूयुए) हे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याची योजना जाहिर करण्यात आली होती. भौगोलिक परिस्थितीनुसार तथा हे उपकेंद्र उभारण्याच्या व्यवहार्ततेनुसार अर्जदारांना हे सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर होणार आहेत. हे सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळच्या ३३/११ के व्ही. उपकेंद्राशी थेट जोडले जाणार आहेत. महाउर्जा विकास अभिकरण द्वारा महावितरणच्या कार्यक्षेत्रात कुसुम योजणा घटक ब राबविण्यात येत आहे.
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या लिंक वर जाऊन अर्जदार अर्ज करु शकतील.