चंद्रपूर दि. 8 नोव्हेंबर: रक्तदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य समजून नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा शासनातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. रक्तदाते हे रक्त केंद्राचे आधारस्तंभ आहेत, त्यामुळे त्यांचा सत्कार करून त्यांना रक्तदानास प्रोत्साहित करण्याचा राज्य रक्त संक्रमण परिषदेचा मानस आहे. या अनुषंगाने चंद्रपूर येथील शासकीय रक्तकेंद्र, स्वैच्छिक रक्तदान शिबिर संयोजक, संस्था (एकूण रक्त संकलन 500 रक्तदात्यांपेक्षा जास्त) व ज्या स्वैच्छिक रक्तदात्यांनी 50 ते 100 वेळा स्वैच्छिक रक्तदान केले आहे, अशा रक्तदात्यांचा सत्कार होणार आहे. या सत्कार समारंभासाठी अशा संस्थेची व स्वैच्छिक रक्तदात्यांची सविस्तर माहिती 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
या माहितीमध्ये प्रामुख्याने स्वैच्छिक रक्तदाते व संस्थेचे नाव, रक्तगट, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक तसेच 30 सप्टेंबर 2021 पर्यंत केलेल्या रक्तदानाची तारीख, रक्तपेढी निहाय माहिती विहित नमुन्यात पाठविणे अपेक्षित आहे.
याकरिता सत्कार पात्र सर्व 50 पेक्षा जास्त रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांनी शासकीय रक्त केंद्र, सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे त्वरित संपर्क साधून आपली माहिती रक्त केंद्रात सादर करावी. जेणेकरून शासनास अपेक्षित सत्कारमूर्ती रक्तदात्यांचा यथोचित सत्कार करता येईल असे आवाहन रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे यांनी केले आहे.