चंद्रपूर दि. 16 ऑक्टोबर: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ब्रेक-द-चेन अंतर्गत जिल्ह्यातील चित्रपटगृहे शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून दि. 22 ऑक्टोबर 2021 पासून नियंत्रित स्वरुपात सुरु करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.
सर्व संबंधितांनी चित्रपटगृहाचे परिचालन, कोविड-19 संदर्भातील केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधाचा भंग होणार नाही अशा पद्धतीने करणे आवश्यक आहे. तसेच मार्गदर्शक तत्त्वांचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून व या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील बंधनकारक असणाऱ्या सूचना या प्रकरणी लागू राहतील.
सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 22 ऑक्टोबर 2021 पासुन पुढील आदेशापर्यंत लागू राहील.