नागरिकांच्या समस्यांवर चंद्रपूर मनपा प्रशासनाची डोळेझाक!
चंद्रपूर: सध्या चंद्रपुरात डेंगू व इतर संसर्गजन्य रोगांची साथ सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असणारा मनपा प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत गाढ झोपेत आहे. स्वच्छतेच्या नावाने मनपा मध्ये “बोम” आहे असं म्हटलं तरी चालेल. शहराच्या कोणत्याही भागात मनपा प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत कोणतेच पाऊल उचलले जात नसल्याचे दिसत आहे. फक्त कागदोपत्री स्वच्छतेच्या बोंबा मारणारा मनपा प्रशासन व त्याचे पदाधिकारी सभागृहात दंगे करण्यामध्ये मस्त असल्याचे दिसत आहे. डेंग्यूची साथ ही संसर्गजन्य आहे. परंतु शहरामध्ये स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे या साथीच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात शहरात वाढला. स्वच्छतेच्या बाबतीत मात्र एखाद्या ठोस पाऊल उचलण्याऐवजी फक्त कागदावर स्वच्छतेच्या बोंबा मारणारी मनपा नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत उदासीन असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी पवित्र असलेल्या सभागृहामध्ये स्वतःच्या अस्तित्वासाठी खालच्या स्तरावरची पावले उचलत असल्याचे चंद्रपूरकरांनी बघितले आहे. सभागृहाची मान मर्यादा न राहता अस्तित्वासाठी सभागृहाचा अपमान करणारे जनप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात पसरलेल्या डेंगू साथीवर स्वच्छतेच्या बाबतीत मात्र मनपामध्ये मौन धरून बसले आहेत. 29 जुलै रोजी महानगरपालिका सभागृहात झालेला तांडव हा मनपाला कलंकित करणारा राहिला. स्वतःच्या सन्मानासाठी दुसऱ्याच्या अपमान असे नाट्य 29 जुलैला चंद्रपूर मनपा मध्ये घडले. ज्या सत्ताधारी व विरोधक प्रतिनिधींनी हा लाजीरवाणा प्रकार केला ते प्रतिनिधी चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी कधीही या स्तराची ओरड करत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.