चंद्रपूर(वि. प्र.)राज्याच्या महसूल विभागातील अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी अजित पवार यांची भारतीय प्रशासकीय सेवेत नियुक्ती करण्यात आली आहे. श्री अजित बाबूराव पवार हे वर्ष 2003 ते 2008 पर्यंत चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.
सध्या ते पुण्यात रुजु आहेत. आणि पुण्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष असून, त्यांच्याकडे पुणे, कोल्हापूर, सातारा या तीन जिल्ह्याची जात वैधता पडताळणी ची जबाबदारी आहे. 2003 ते 2008 पर्यंत चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी संजीव जयस्वाल, पोलीस अधिक्षक अब्दुर रहमान यांच्या सोबत शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. महाकाली मंदिरात भाविकांच्या दर्शनाच्या सोई साठी दुसऱ्या दाराची सोय करुन दिली. क्रीडा क्षेत्रात त्यांची विशेष रुची असल्याने चंद्रपूर येथील जिल्हा स्टेडियमच्या सोयी सुविधा वाढविण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.अनेक क्रीडा स्पर्धाचे आयोजन त्यांच्या कारकिर्दीत शहरात झाले होते. ते स्वतः उत्कृष्ठ वॉलीबाल प्लेयर आहे. चंद्रपूर मध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असतांना एक वेळ अशी आली होती की त्यांना चंद्रपूर सोबतच ब्रम्हपुरी व राजुरा या तीन ठिकाणचा प्रभार देण्यात आला होता आणि तो त्यांनी व्यवस्थित पार पाडला. अत्यंत मनमिळावू, सर्वसामान्य जनता व गोर गरीबांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. आता त्यांची राज्याच्या महसूल खात्यातून भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती करण्यात आली आहे.चंद्रपूरकरांतर्फे त्यांचे अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा!