चौकीदार विरोधात पालिकेची रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार
चंद्रपूर, ता. ८ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी “आसरा” कोविड हॉस्पीटल चंद्रपूर माहे मे २०२१ मध्ये सुरु करण्यात आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने सदर हॉस्पीटल येथे १६ नग कॅमेरे लावण्यात आले. ०८/०७/२०२१ रोजी रात्री ११.३० ते रात्री १२.०० च्या दरम्यान कॅमेऱ्याची इलेक्ट्रीक सप्लाय केबल लाईन तोडून बाहेरील भागातील बुलेट आऊटडोअर कॅमेरा चोरीस गेला. याप्रकरणी महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
“आसरा” कोविड हॉस्पीटल येथे चौकीदार म्हणून शंकर सुभाष वैरागडे, (रा. सिव्हील लाईन, वसंतराव नाईक चौक, ट्रॉफीक ऑफीसच्या बाजुला, मुख्य बस स्टॅन्डच्या मागे), चंद्रपूर, वय -३५ हा कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. परन्तु दिनांक ०९/०६/२०२१ ला अंदाजे रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान हॉस्पीटल परिसरात मद्यपान करुन डॉक्टर, सिस्टर यांच्याशी असभ्य वर्तवणूक केल्याप्रकरणी त्याला दिनांक १३/०६/२०२१ रोजी कामावरुन काढण्यात आले. सध्या कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने “आसरा” हॉस्पीटल दिनांक ०५/०७/२०२१ रोजी तात्पुरते बंद करण्यात आले आहे. दिनांक ०८/०७/२०२१ रोजी रात्री ११.३० ते रात्री १२.०० च्या दरम्यान शंकर सुभाष वैरागडे, चंद्रपूर यांनी कॅमेऱ्याची इलेक्ट्रीक सप्लाय केबल लाईन तोडून बाहेरील भागातील बुलेट आऊट डोअर कॅमेरा चोरून नेला, असे सीसीटीव्हीची तपासणी केली असता स्पष्ट दिसून आले. यासह मनपा हॉस्पीटलमधील मालमत्तेस हानी पोहचवण्यात आली आहे. सदर केबलची किंमत रु. ५००/ – व सीसीटीव्ही कॅमेरेचे रु. ६,०१८ / – असे एकुण रु. ६,५१८ / – आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले. भविष्यात संबंधित व्यक्ती शासकीय मालमत्तेस नुकसान करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे याप्रकरणी शंकर सुभाष वैरागडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून फौजदारी कार्यवाही करण्यात यावी, अशी तक्रार आसरा कोविड हॉस्पीटलचे सहा. नोडल अधिकारी तथा महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.