सोमवारपासून चंद्रपूर जिल्ह्यात निर्बंधामध्ये शिथिलता

वाचा काय राहणार सुरु;काय बंद?

चंद्रपूर दि. 4 जून:-  राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात कमी होत असल्याने शासनाच्या सुचनेप्रमाणे जिल्ह्यात कडक/प्रतिबंधात्मक निर्बंधास काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार सोमवार दि. 7 जूनपासून अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील.
जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा (वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत सेवा वगळून) सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत कोविड विषयक वर्तणुक नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरु ठेवण्यास परवानगी राहील. संपूर्ण जिल्हयातील अत्यावश्यक सेवाव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची एकल दुकाने/आस्थापना (मॉल्स/शॉपींग कॉम्प्लेक्स/सुपर बाजार/सलुन/स्पा/जिम इत्यादी वगळून) सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील. सदर एकल दुकाने/आस्थापना शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी संपुर्णत: बंद ठेवण्यात यावी.
जिल्हयातंर्गत अत्यावश्यक सेवा/वस्तु तसेच अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर प्रकारची सेवा/वस्तु ई-कामर्सच्या माध्यमातुन सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत वितरीत करण्यास परवानगी राहील. नागरीकांना दुपारी 3 या वेळेनंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणी प्रसंग तसेच घरपोच सेवा या कारणांशिवाय बाहेर येण्या-जाण्यावर निबंध असतील. राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित सर्व शासकीय कार्यालये 25 टक्के कर्मचारी क्षमतेने कार्यरत राहतील. तथापी कोविड-19 संबंधित अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांना यातून वगळण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय कार्यालयांच्या बाबतीत अधिक उपस्थितीकरीता संबंधित कार्यालय प्रमुख यांनी स्थानिक आपत्ती प्राधिकरणाची परवानगी घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा.
चंद्रपूर जिल्हयांतर्गत दुकाने/आस्थापना यांना पुरवठा केल्या जाणा-या वस्तुंच्या मालवाहतुकीवर कोणतेही निर्बध असणार नाहीत. मात्र दुकानदारांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास अशी दुकाने/आस्थापना कोरोना साथ संपेपर्यंतच्या कालावधीकरीता बंद ठेवण्यात येईल तसेच यापुर्वीच्या आदेशातील नमुद तरतुदीनुसार दंडसुध्दा आकारण्यात येईल,
या आदेशाचे उल्लंघन करणा-यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर आदेश संपुर्ण चंद्रपूर जिल्हयाचे कार्यक्षेत्रात दिनांक 7 जून च्या सकाळी 7 वाजेपासून 15 जून 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागु राहतील, असे जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशात नमुद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here