चंद्रपूर, दि.12 मे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊनप्रमाणे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बंदच्या काळात अत्यावश्यक बाबींना सूट देण्यात आली आहे. मात्र तरीही काही नागरिक याचा फायदा घेत विनाकारण घराबाहेर पडत आहे. यावर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरू केली आहे. तपासणीअंती विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात येत आहे.
आज बल्लारपूर शहरातील गोल पुलिया आणि नगरपरिषद चौक या दोन ठिकाणी बाहेर वावरणाऱ्या 70 व्यक्तींची अॅटींजेन तपासणी करण्यात आली. तपासणीअंती 9 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
वरोरा शहरातील आंबेडकर चौक येथे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 78 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे त्या व्यक्तीला शहरातील कोविड केअर सेंटर मध्ये पाठविण्यात आले आहे.
चिमूर शहरात आज दिवसभरात एकूण 50 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकाही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही.
तर सावली शहरात मुल-गडचिरोली या मुख्य रस्त्यावर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 90 नागरिकांची अॅटींजेन तपासणी करण्यात आली त्यापैकी 6 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या असून त्या सर्वांना सावली येथील कोविड केअर सेंटर येथे पाठविण्यात आले आहे.
भद्रावती शहरात 25 व्यक्तींची अॅटींजेन तपासणी करण्यात आली असून सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा. व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.