चंद्रपूर, ता. २४ : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या काठावर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जातात. महानगर नगर पालिकेचे कर्मचारी हे सेवाकार्य नियमित करीत असताना २३ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास डिझेल वेळेत न पोहचल्याने अंत्यविधीला उशीर झाला. यावेळी मृताच्या नातलगांनी मजूर कर्मचारी मिलिंद शंकरराव पुट्टेवार (वय 26 वर्षे) यास शिवीगाळ करुन हाताबुक्यांनी मारहाण केली व पळुन गेले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरुन कलम 323, 504, 506 भादंविप्रमाणे एनसी नोंद करण्यात आली.
महानगरपलिकातर्फे सध्या कोविडच्या कामात स्मशानभूमी येथे मृतदेह जाळण्याच्या कामावर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. फिर्यादी मिलिंद शंकरराव पुट्टेवार (वय 26 वर्षे) व त्याचे सहकारी इरई नदीच्या काठावर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत नेहमीप्रमाणे कोरोना संक्रमित असलेल्या मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित होते. त्या दरम्यान दवाखाण्यातून शववाहिकेद्वारे कोरोना संक्रमीत मृतदेह आणण्यात आले. मजूर कर्मचाऱ्यांनी नदीच्या काठावर अंत्यविधी करता लाकूड रचून ठेवले होते. मृताच्या नातलगाकडून धार्मिक पध्दतीने पुजाअर्चना झाल्यानंतर मृतदेह जाळण्याकरिता लागणाऱ्या डीझेलची वाट पाहत होते. तेव्हा बाळापूर तळोधी येथील मृताचे ईतर नातेवाईकापैकी अंदाजे अनोळखी तीन ते चार व्यक्ती हे मिलिंद शंकरराव पुट्टेवार (वय 26 वर्षे) याच्याजवळ आले. “दहन करायला ऐवढा उशीर का लागत आहे” अशी विचारणा केली. तेव्हा त्यांनी “डीझेल यायचे आहे. मी सुध्दा डीझेलची वाट पाहत आहो”, असे म्हटले. तेव्हा अज्ञात व्यक्तींनी मिलिंद यांचे म्हणणे ऐकुन न घेता शिवीगाळ करुन हाताबुक्यांनी मारहाण केली व पळून गेले. त्यानंतर डीझेल आल्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरुन कलम 323, 504, 506 भादंविप्रमाणे एनसी नोंद करण्यात आली.