चंद्रपूर: विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर शहरात दुसरे आर.टी.पी.सी.आर. चाचणी केंद्र नागरिकांच्या सेवेत रूजु झाले असुन दिनांक २१ एप्रिल रोजी या आर.टी.पी.सी.आर. चाचणी केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्ष हरीश शर्मा व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. दिनांक 17 एप्रिल रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर शहरातील डॉक्टरांशी संवाद साधला असता डॉक्टरांनी वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता दुसरे आर.टी.पी.सी.आर. चाचणी केंद्र उघडण्यात यावे अशी मागणी केली होती. आ. मुनगंटीवार यांनी त्वरीत कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची तिनच दिवसात आ. मुनगंटीवार यांनी पुर्तता करत नागरिकांना दिलासा दिला आहे.
बल्लारपूर शहरातील वस्ती विभागातील काजी बहुउद्देशिय सभाग़हात हे आर.टी.पी.सी.आर. चाचणी केंद्र तयार करण्यात आले असुन यामाध्यमातुन आता बल्लारपूरकर नागरिकांना सदर चाचणीसाठी मोठी सोय उपलब्ध झाली आहे. या केंद्राच्या माध्यमातुन 24 तासाच्या आत शासनमान्य लॅबच्या माध्यमातुन रिपोर्ट उपलब्ध होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बल्लारपूर शहरात कोविड केअर सेंटर सुध्दा लवकरच उपलब्ध होईल यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार प्रयत्नशिल असुन याबाबतच्या प्रस्तावावरील कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
सदर आर.टी.पी.सी.आर. चाचणी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष हरीश शर्मा, काशिसिंह, निलेश खरबडे, मनिष पांडे, अजय दुबे, बुचया कंदीवार, सतीष कनकम, स्वामी रायबरम, रोहीत गुप्ता आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बोलतांना नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी बल्लारपूरकर जनतेच्या वतीने आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. विकासकामे असेा व लोकहिताचे उपक्रम आ. मुनगंटीवार यांनी नेहमीच नागरिकांना दिलेला शब्द प्राधान्याने पुर्ण केला आहे. जनतेच्या सुखदुखात समरस होत त्यांच्या चेह-यावर आनंद फुलावा यासाठी प्रयत्नरत असलेला हा लोकनेता आमचा लोकप्रतिनीधी आहे. हे आमचे भाग्य असल्याचे हरीश शर्मा यावेळी बोलताना म्हणाले.