कंत्राटदारांची देयके अडकली शासन दरबारी,9 एप्रिल ला कंत्राटदार करणार ‘धरणे आंदोलन’
चंद्रपूर: शासनाची गेल्या दोन वर्षापासून राज्यातील सर्व विभागांच्या कंत्राटदाराची देयके देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात टाळाटाळ सुरु आहे, ती तातडीने थांबवावी, अन्यथा मोठा आंदोलन करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांना निवेदनाव्दारे कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष संदीप कोठारी यांनी दिला आहे. दरम्यान 9 एप्रिल ला कंत्राटदारांच्या या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बिल्डर्स असोसिएशन, चंद्रपूर च्या वतीने नागपूर रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंडल कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.राज्याचा विकासाचा अत्यंत महत्वाचा घटक कंत्राटदार आहे. मार्च २०२० मध्ये अचानक लॉकडाउन आणि कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी राज्यातील कंत्राटदारांची देयके शासनाने दिली नाही. मात्र शासनाकडून अद्याप देयके देण्याबाबत कोणतीही कार्यवाही सुरु असलेली दिसत नाही. यावर्षी मार्च मध्ये कंत्राटदारांना त्यांच्या बिलाचे फक्त २ टक्के पेमेंट शासनाने केले आहे. कंत्राटदाराचे कुटुंब आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे मजूर व इतर घटकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. कोरोनाचे कारण दाखवून जाणीवपूर्वक राज्यातील कंत्राटदारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुर्दैवाने राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आंदोलन बैठक, मंत्रालयात व कार्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नियमांचा आधार घेऊन कंत्राटदारांना वेठीस धरले जात आहे. शासनाचे हे धोरण चुकीचे असल्याचे म्हटले आहे. येत्या ८ तासांत शासनाने सर्व विभागांतील कंत्राटदारांची देयके देण्यासाठी तातडीने निधी वितरित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय कंत्राटदारांनी केलेल्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यात येत्या काळात मोठे आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. अन्यथा धरणे आंदोलन, निविदा बहिष्कार व काम बंद असा इशारा असोशिएशन तर्फे देण्यात येत आहे.
यावेळी अध्यक्ष संदीप कोठारी, नितिन पुगलिया, रामपाल सिंग, विनोद मनियार, जी. टी. सिंग, विलास सोनटक्के, उत्तम पाटील, सुदीप रोडे, क्रिष्णा सरकार, श्रीकांत भोयर, कौस्तुभ खांडरे, विनोद नळे, राहुल रच्चावार, आणि रिजवान अली उपस्थित होते.