चंद्रपूर : परमबीर सिंह यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात फेरबदलाचा निर्णय सरकारनं घेतल्यानंतर नगराळे यांच्याकडं ही जबाबदारी देण्यात आली आहे. नगराळे सध्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी आहेत. महासंचालक पदावरून त्यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आणण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यामुळं हेमंत नगराळे यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, मुंबईचे नवे पोलीस आयुक्त होणारे हेमंत नगराळे यांची आजपर्यंतची कारकिर्द पाहुया.
हेमंत नगराळे यांची कारकिर्द कशी राहिली?
मूळचे चंद्रपूरचे असलेल्या हेमंत नगराळे यांनी भद्रावती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतले आहे. नगराळे हे मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. ते 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून सध्या नगराळे यांच्याकडं महासंचालकपदाची (कायदे व तांत्रिक विभाग) जबाबदारी आहे. त्यासोबतच त्यांना महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या नक्षलग्रस्त भागात त्यांची पहिली पोस्टिंग होती. 1992 ते 1994 या काळात ते सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त होते. 1992 च्या दंगलीनंतर सोलापूरमधील कायदा व सुव्यस्थेची स्थिती त्यांनी उत्तम प्रकारे हाताळली होती. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक असताना 1994 ते 1996 या काळात दाभोळ ऊर्जा कंपनीशी संबंधिक भूसंपादनाचं प्रकरण त्यांनी हाताळलं होतं. 1996 ते 1998 मध्ये पोलीस अधीक्षक, सीआयडी व गुन्हे शाखेत विविध पदांवर असताना त्यांनी राज्यव्यापी असलेल्या एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी केली होती. 2016 मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यावेळी तेथील बँक ऑफ बडोद्यावरील दरोड्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या दरोड्याची देशभर चर्चा झाली होती. नगराळे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला.
अनेक मोठमोठ्या घोटाळ्यांच्या चौकशीत महत्वाची भूमिका नगराळे यांनी 1998 ते 2002 या काळात सीबीआयमध्ये कर्तव्य बजावलं. या कार्यकाळात त्यांनी अनेक मोठमोठ्या घोटाळ्यांच्या चौकशीत महत्वाची भूमिका बजावली आहे. यात महत्वाचं म्हणजे बँक ऑफ इंडियातील केतन पारेख घोटाळा, माधोपुरा को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा, हर्षद मेहताचा घोटाळा, तेलगी मुद्रांक घोटाळ्यांच्या समावेश आहे.