चंद्रपूर, दि. 5 मार्च : दिनांक 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाकडे ज्या मतदारांनी त्याचा एकल मोबाईल क्रमांक नोंदविलेला आहे, अश्या मतदारांना ई- मतदान छायाचित्र ओळख पत्र (इ-इपिक) डाउनलोड करण्याची सुविधा राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल व मतदार सहाय्यता अॅपव्दारा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी सर्व मतदारांनी आपले मतदान ओळखपत्र डाउनलोड करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
मतदान ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी आवश्यक उपाययोजना म्हणून दिनांक 6 व 7 मार्च 2021 रोजी मतदान केंद्रावर विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे जावून आपले इ-इपिक डाउनलोड करुन घेण्याबाबत सहाय्य घ्यावे. इ-इपिक डाउनलोड करण्याची सुविधा फक्त नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांसाठीच उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्या मतदारांनी नव्याने नोंदणी केलेली आहे अशा मतदारांची यादी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे पाहण्यास उपलब्ध करुन देण्यात आलेली असल्याचे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी कळविले आहे.