कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, अमरावतीत सात दिवसांचा ‘लॉकडाउन’

अमरावती : अमरावतीत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीत कोरोनाचे दररोज मोठ्या प्रमाणात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. अमरावतीत कोरोनाचा विळखा अतिशय घट्ट झाला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन अमरावतीत पुढच्या आठवड्यात लॉकडाऊन घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. यशोमती ठाकूर यांनी स्वत: पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. हा लॉकडाऊन सोमवारी ( 22 फेब्रुवारी) संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहरात आठवड्याभरासाठी घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी असणार आहे. यावेळी यशोमती ठाकुर यांनी नागरिकांना मास्क वापरणं आणि नियमाचं पालन करण्याचं भावनिक आवाहन केलं असून याशिवाय अमरावतीत आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, अस देखील त्या यावेळी म्हणाल्या.
जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मूभा
सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना मृत्यू दर हा सध्या 1.6 टक्के इतका आहे. आम्हाला नाईलाजाने फक्त जीवानाश्यक वस्तू सुरु ठेवावी लागणार आहेत. अमरावती शहरात पूर्ण कंटेन्मेंट झोन घोषित करुन लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. शहरातील बाजार हे गाईडलाईन्सनुसारच सुरु राहतील, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here