चंद्रपूर दि.20:चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज एका आदेशान्वये जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांचेसह सर्व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व कार्यालय प्रमुख व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पुढीलप्रमाणे विविध जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.
यानुसार समर्पित कोविड रुग्णालय, कोविड केअर सेंटर इत्यादींची तपासणी करणे व यासाठी यापुर्वी वापर करण्यात आलेल्या इमारतींची तपासणी करुन त्यामध्ये रुग्णांसाठी आवश्यक साहीत्य हे कुठल्याही क्षणी वापरता येतील अशा स्थितीत आणून ठेवण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करणे.
जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांचा नियमित आढावा घेऊन त्यांचेकडे उपचारासाठी येणा-या प्रत्येक रुग्णांची माहिती घेऊन त्यापैकी संशयीत रुग्णांची माहिती घेऊन त्यांना आरटीपीसीआर चाचणी करुन घेणे व खाजगी रुग्णालयांना नियमित भेटी देणे.
सौम्य, अतिसौम्य लक्षणे असलेल्या कोव्हीड-19 बाधीत किंवा संशयीत रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनी गृह विलगीकरण अलगीकरणाची रितसर परवानगी घेऊन त्याबाबतच्या नियमांचे पालन करीत
आहे किंवा नाही याची तपासणी करणे.
नविन रुग्णांच्या संपर्कात असलेल्या कमीत कमी 20-30 व्यक्तीचा सुरुवातीच्या 48 तासांच्या आत शोध घेणे, त्यांना गृह विलगीकरण, अलगीकरण करणे, बाधीत रुग्णांना विषाणूचा संसर्ग कुठून झाला याबाबत त्या ठिकाणाचा कार्यक्रमांचा शोध घेणे व त्यांची कोरोना तपासणी करणे.
एखाद्या परीसरात कोव्हीड-19 बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास सदरचा परिसरातील व्यक्तींच्या हालचालीवर निर्बंध लागू करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) तयार करण्यात यावेत. तसेच कंटेनमेंट झोन मधील सुचनांचे उल्लंघन करणा-या व्यक्तींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करणे.
सिटी स्कॅन सेंटर, खाजगी रेडीओलॉजी, पॅथोलॉजी लॅब यांनी कोव्हीड-19 संशयीत आढळून येणा-या रुग्णांचे अहवाल जवळच्या ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय अधिकारी, नगरपालीका/पंचायत यांना पाठविणे बंधनकारक करण्याबाबत कळविणे व सदर ठिकाणी नियमित भेटी देणे.
लग्न समारंभ व अत्यंविधी तसेच इतर मोठया प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रमांना नियंत्रित करणे. लग्न समारंभात एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्ती तसेच अंत्यविधीसाठी 20 पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहणार नाही याची दक्षता घेणे, लग्न समारंभासाठी स्थानिक पोलीस स्टेशन व स्थानिक स्वराज्य संस्था यांची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. मंगल कार्यालय/लॉन्स/हॉल च्या ठिकाणी मास्कचा वापर न करणा-या व्यक्ती 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास त्याबाबतची जबाबदारी निश्चित करुन नियमानुसार कारवाई करणे.
सर्व हॉटेल, रेस्टारंट, कॅफे, कॅन्टिन, डायनिंग हॉल, रिसोर्ट इत्यादी तत्सम ठिकाणाच्या आदरातिथ्य सेवा 50 टक्के क्षमतेसह सकाळी 09.00 ते रात्री 10.00 पर्यंत सुरु राहतील याची खातरजमा करणे.
जिम, खेळाची मैदान, स्पोर्ट कॉम्प्लेक्स इ. ठिकाणी कोरोना विषयक नियमावलीचे पालन व अंमलबजावणी करणे.
शाळा, कॉलेजेस मध्ये सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मास्कचा वापर करतात काय हे तपासणे, प्रत्येक वर्गात सॅनिटायझर अथवा हात धुण्यासाठी साबण
उपलबध ठेवणे. संशयीत विद्यार्थ्यांची RTPCR चाचणी करुन घेणे.
खाजगी कोचिंग क्लासेस, स्पर्धा परिक्षा केंद्रे इत्यादीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग, मास्क वापर, सॅनीटायझरचा वापर होत आहे किंवा नाही यांची तपासणी करणे. तसेच सदर ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रवेश करण्यापूर्वी सॅनीटायझरचा वापर करणे, हात वारंवार धुणे इत्यादीबाबत सुचना निर्गमित करणे.
भाजीपाला मार्केट, शॉपींग कॉम्प्लेक्स, मॉल या गर्दीच्या ठिकाणी सर्व दुकानदार, त्यांचे कर्मचारी, विक्रेते यांनी मास्क लावणे बंधनकारक करणे तसेच प्रवेश द्वाराजवळ सॅनिटायझर उपलब्ध ठेवणे. तसेच सदर ठिकाणी गर्दी नियंत्रित करण्यासाठी एका वेळी केवळ 5 ग्राहकच उपस्थित राहतील याबाबत कार्यवाही करावी.
शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक करणे, सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतः मास्क वापरणे, हात स्वच्छ करण्यासाठी साबण सॅनीटायझर ची व्यवस्था करणे.
मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींवर पोलीस विभागामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या फिरत्या पथकामार्फत व इतर पथकांमार्फत शासनाच्या निर्देशाप्रमाणे दंड आकारणी करण्याबाबत निर्देश देणे.
एस.टी, बसेस, ट्रॅव्हल्स, रिक्षा, कॅब, काळी-पिवळी यांना अनुज्ञेय क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविण्यास बंदी करणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याचे निर्देशास आल्यास दंडात्मक कार्यवाही करणे तसेच मास्क शिवाय वाहनात प्रवेश नाकारणे. रेल्वेद्वारे विना मास्क प्रवास करणा-या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करणे.
सार्वजनिक उद्याने व बगीचे कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुनच खुली ठेवावीत व सदर ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे.सिनेमागृहामधील सर्व प्रेक्षक, कर्मचारी यांनी मास्कचा चापर करणे तसेच गर्दीचे नियम पाळणे याची खातरजमा करणे.बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक प्रसाधन गृहे व इतर ठिकाणचे वेळोवेळी निर्जंतुकीकरन करणे.
वरील प्रमाणे वैद्यकीय बाबी व नियंत्रणात्मक बाबी अमलात आणण्यासाठी कार्यालयातील अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायदा, व इतर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेशीत केले आहे.