पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि.१७ : विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यास  दिनांक २० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
श्री. सामंत म्हणाले, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील उच्च व तंत्रशिक्षण विभागातील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता प्रवेश घेणाऱ्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या उमेदवारांसाठी EWS मुळ प्रमाणपत्र, NCL मुळ प्रमाणपत्र, मुळ जात पडताळणी प्रमाणपत्र (CVC) सादर करण्यासाठी दिनांक २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेतला असून याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. ही मुदतवाढ अंतिम असून या नंतर कोणत्याही स्वरूपाची मुदत वाढवून देण्यात येणार नाही याची नोंद विद्यार्थी व पालकांनी घ्यावी.
श्री.सामंत म्हणाले, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व उमेदवारांनी दिनांक २० जानेवारी २०२१ पर्यंत स्वत:च्या लॉगीनमधुन ऑनलाईन पध्दतीने मुळ प्रमाणपत्र सादर करावी. जे उमेदवार मुळ प्रमाणपत्र दिनांक २० जानेवारी २०२१ सायंकाळी ०५.०० पर्यंत सादर करणार नाही. अशा उमेदवारांचा प्रथम फेरीतील प्रवेश रद्द करुन त्यांना दुसऱ्या फेरीकरिता खुल्या वर्गातून पात्र ठरविण्यात येईल याची नोंद घ्यावी.
ज्या उमेदवारांनी वरील तीन प्रमाणपत्राकरिता अर्ज केल्याची पावती ऑनलाईन अर्ज करताना सादर केलेली आहे, अशाच उमेदवारांना ही मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच पुढील सुधारित वेळापत्रक दिनांक १८ जानेवारी २०२१ नंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे श्री. सामंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here