नागपूर विभागातील जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई, दि. 6 : नागपूर प्रादेशिक मंडळातील मुख्यमंत्री जलसंधारण योजनेअंतर्गत प्रलंबित कामांना सुधारित प्रशासकिय मान्यता देऊन पुढील कामांना गती द्यावी. याचबरोबर जलसंधारण विभागातील उपअभियंता संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने तातडीने भरावीत, जलसंधारणाच्या संबंधित कामांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती असलेले सल्लागार नेमून त्यांच्या सल्ल्याने कामांची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
विधीमंडळात नागपुर प्रादेशिक महामंडळाअंतर्गत जलसंधारण विभाग आणि महामंडळाच्या कामांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस राजुराचे आमदार सुभाष धोटे, जलसंधारण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री.नंदकुमार यासह विभागातील संबंधित अधिक्षक अभियंता आणि अधिकारी उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील गुडसेला, कोदेपुर, जिवती लघु पाटबंधारे  तलावासंदर्भात वनजमिन घोषित झाल्याने, वन विभाग, जिल्हाधिकारी आणि जलसंधारण विभागाने सुधारित प्रशासकिय मान्यता घेऊन पुढील कार्यवाहीस गती द्यावी आणि त्यासंदर्भातील अहवाल शासनास त्वरीत सादर करावा. किरमीरी आणि अन्य लघु पाटबंधारे तलावांच्या दुरूस्तीसाठीचा निधी उपलब्ध करून द्यावा. जलसंधारण विभागाअंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे होणाऱ्या पदभरती व्यतिरिक्त १८३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी. जेणेकरून जलसंधारण विभागासंदर्भातील प्रलंबित कामे पूर्णत्वास नेता येतील, असेही अध्यक्ष नाना पटोले यांनी  यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here