चंद्रपूर १ जानेवारी २०२१ – नायलॉन मांजामुळे होणारे जीवघेणे धोके लक्षात घेता चंद्रपूर महानगरपालीका, पोलीस विभाग, स्वयंसेवी संस्था यांची संयुक्त पथके निर्माण करण्यात आली असुन परस्पर सहकार्याने अश्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंबंधीची सहकार्य बैठक उपायुक्त श्री. विशाल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली मनपा स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली.
याप्रसंगी उपायुक्त म्हणाले की, स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी नायलॉन मांजाची विक्री करून इतरांना वेदना देणे हा घृणास्पद प्रकार आहे. आर्थिक फायद्यांकडे बघून हा मांजा छुप्या मार्गाने विकणाऱ्या विक्रेत्यांनी लोकांच्या जीवाचा विचार करावा. पालकांनीही लहानग्या मुलांच्या हाती कुठला मांजा सोपविला जातो आहे, हे बघायला हवे. त्यांना नायलॉन मांजा वापरण्यापासून परावृत्त करायला हवे. म्हणूनच अशा मांजा वापरावर निर्बंध यावेत यासाठी महानगरपालिका कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मनपा, पोलीस विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्वयंसेवी संस्था यांच्या ७ कर्मचाऱ्यांचे ३ संयुक्त पथके तयार करण्यात आली असुन अश्या विक्रेत्यांवर ते कारवाई करणार आहेत.
नायलॉन मांजाचा वापर करतांना आढळल्यास तुरुंगवासाचीही तरतूद आहे. केवळ विक्रीची ठिकाणेच नाही तर गोदामे, साठवणुकीची ठिकाणे, घरून विक्री करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
हा ठरावीक काळापुरता व्यवसाय आहे याची आम्हाला कल्पना आहे. व्यवसायीकांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने सर्वांना अवगत करण्यात येत आहे. मनपा पूर्ण सहकार्यास तयार आहे. व्यवसायीकांनी किंवा नागरीकांनी नायलॉन मांजाचा वापर , विक्री करणाऱ्यांची माहिती मनपास द्यावी त्यावर उचित कारवाई करण्याचे चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
याप्रसंगी मांजा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना बैठकीत बोलावुन नायलॉन मांजा न विकण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले. बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, मनपा सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक चंद्रपूर शहर व रामनगर, इको प्रो प्रतिनिधी, स्वच्छता विभाग प्रमुख व सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.