12 डिसेंबर पासून शासकीय रुग्णालयामधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त

मुंबई, 10 डिसेंबर : राज्यात शनिवार 12 डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत: रक्तदान करून नागरिकांनाही रक्तदानासाठी आवाहन केलं.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज दुपारी राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह सुप्रिया सुळे आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं. यावेळी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. अरूण थोरात आदी उपस्थित होते.
यावेळी राजेश टोपे म्हणाले की, शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी 800 रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्याला मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here