… चक्क घरासमोर उभी असलेली स्विफ्ट डिझायर गाडी चोरट्यांनी पळविली !
रामनगर परिसरातील शेंडे प्लॉट येथील घटना !
चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रामनगर परिसरामधून १५ तारखेला रात्रौ चोरट्यांनी रस्त्यावर उभी असलेली स्विफ्ट डिझायर कार चोरून नेली, त्यामुळे या परिसरात चोरट्यांवर पोलिसांचे नियंत्रण नसल्याचे लक्षात येत आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील प्रसिद्ध रामनगर परिसरामध्ये झालेल्या चोऱ्यांवर अंकुश लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. यापूर्वी ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेले मेडिकल शॉप चोरट्यांनी फोडले होते. आता तर चक्क कार चोरीमुळे या परिसरात खळबळ माजली आहे. शहरातील रामनगर परिसरात शेंडे ले-आऊट मध्ये के. डी. शेंडे यांचे घरी संजयसिंह मौर्य हे किरायाने राहतात. त्यांच्या घरासमोर त्यांची पांढऱ्या रंगांची स्विफ्ट डिझायर कार क्र. एमएच३४-बीबी-०१२९ उभी होती. १५ तारखेला रात्रौ चक्क रस्त्यावर उभी असलेली ही कार चोरट्यांनी चोरून नेली. कार चोरीची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या विरोधात रामनगर पोलिस स्टेशन येथे अपराध क्र. ९७९ भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पाच दिवसानंतर ही पोलिसांना कार चोरांवर कारवाई करण्यात यश आले नाही. शहरातील रामनगर परिसरात प्रतिष्ठित नागरिकांचे वास्तव्य असते. या भागात मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, त्यावर अंकुश लावण्यात पोलिस विभाग अपयशी ठरला असून यावर चोरांवर आळा बसविण्यासाठी पोलिसांनी योग्य ते उपाय करावे, अशी मागणी या परिसरात होत आहे. नागरिकांवर आता “सावधान…. घरासमोर गाडी ठेवा, पण सतर्क रहा.” हे म्हणण्याची वेळ आली आहे.
कोरोना संक्रमणाच्या काळात सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती डागाळली आहे. त्यातचं चोरीसारख्या घटनांमध्ये नुकसान होणे हे तापदायक आहे. मागील काही महिन्यांपासून शहरामध्ये अपराधिक प्रवृत्तीने मोठ्या प्रमाणावर आपले डोके वर काढले आहे. नवनियुक्त पोलिस अधिक्षकांसाठी या अपराधीक कृत्यांवर आळा बसविण्याचे आवाहन उभे राहिले आहे. जिल्ह्यात मागील महिन्यात झालेल्या हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे.