आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित
चंद्रपूर: दि. 15 ऑक्टोबर पासून राज्यात आठवडी बाजार पूर्ववत सुरू होणार असून राज्य शासनाने दि. 14 ऑक्टोबर रोजी याबाबत आदेश निर्गमित केला आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढल्यानंतर सुरू झालेल्या लॉकडाऊन दरम्यान आठवडी बाजार बंद करण्यात आले होते मात्र टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू झाल्यानंतर सुद्धा आठवडी बाजार सुरू न झाल्यामुळे या आठवडी बाजारावर अवलंबून असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आल्याने त्यांनी आ. मुनगंटीवार यांची भेट घेतली. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात मदतकार्य व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी पत्रव्यवहार करत चर्चा केली. त्यांनी सुद्धा याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन आ. मुनगंटीवार यांना दिले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांच्या फ्लस्वरूप राज्य शासनाच्या मदतकार्य व पुनर्वसन विभागाने दि.14 ऑक्टोबर रोजी आदेश निर्गमित करून दि. 15 ऑक्टोबर पासून राज्यात आठवडी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सॅनिटायझर ,मास्क चा वापर , गर्दी न करणे , दोन दुकानांमध्ये सुरक्षित अंतर आदी खबरदारी बाळगून राज्यात आठवडी बाजार सुरू होणार आहे . आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आठवडी बाजारावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.