नागरिकांनी सतर्क रहाण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
चंद्रपूर, दि. 14 ऑक्टोंबर : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ईशाऱ्यानुसार दिनांक 14 ऑक्टोंबर ते 17 ऑक्टोंबर या कालावधीत राज्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकरी बांधवांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
सर्व नदीकाठच्या गावांमध्ये विशेष काळजी घ्यावी. सदर कालावधीमध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत या सूचनांचे पालन करावे:
विजांचा कडकडाट सुरू असताना बाहेर जाण्याचे टाळावे, दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वतः सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा. जलसाठा जवळ, नदी जवळ जाऊ नये. लहान मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये.
पुलावरून तसेच नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पुल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पाऊस सुरू असताना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी.
दामिनी लाइटनिंग अलर्ट ॲप डाऊनलोड करा:
पाऊस सुरू असताना वीज पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे वीज पडण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची माहिती दामिनी लाइटनिंग अलर्ट ॲप तात्काळ देते. नागरिकांनी स्मार्टफोनमध्ये दामिनी लाइटनिंग अलर्ट ॲप गुगल प्लेस्टोअरला जावून डाऊनलोड करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष 07172-251597 तसेच टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधावा.