रेस्टारंट मालकांचा सवाल !
चंद्रपूर :
३ ऑक्टोबर २०२० रोजी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव यांनी एका पत्रकाद्वारे रेस्टॉरंट आणि बार सकाळी ०८.०० वाजेपासून उघडे राहतील व रात्री १०.०० वाजता बंद होतील, असा आदेश काढला आहे. परंतु चंद्रपुरात मात्र ही वेळ सायंकाळी सात पर्यंत करण्यात आली असून असा दुजाभाव का असा सवाल आता जिल्ह्यातील रेस्टॉरंट मालक विचारू लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे मार्च महिन्यापासून आलेल्या स्थितीमुळे जिल्ह्यातील सगळेच व्यवसाय ठप्प पडले आहेत. नुकतेच जिल्ह्यातील रेस्टॉरंट निर्देशांचे पालन करून चालू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले परंतु अवधी मात्र सायंकाळी सातपर्यंत देण्यात आला आहे. त्यामुळे मालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. महाराष्ट्र सरकारचे सहसंचालक (पर्यटन) डॉ. धनंजय सावळकर यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या पत्रामध्ये बार व रेस्टॉरंट साठी ठरवून दिलेली वेळ ही रात्रो दहापर्यंत आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यात मात्र सात पर्यंत देण्यात आलेली वेळ रेस्टारंट मालक पूर्णपणे पाळत असून बसलेल्या दुजाभावामुळे असंतोष निर्माण झाला आहे. पूर्वी डबघाईस आलेली उद्योगधंदे त्यात यात कार्यरत असणारे कामगार मजूर यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी जिल्ह्यातही रेस्टॉरंटला राज्याप्रमाणे वेळ देण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
महत्त्वाचे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत असून त्यावर नियंत्रण नाही आणल्या जात आहे. मार्च महिन्यापासून ची परिस्थिती बघता सामान्य वर्ग व व्यावसायिक यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या मासीक पगार देण्याएवढे ही उत्पन्न आज हॉटेल व्यवसायातून निघत नसल्यामुळे मजूर व कामगार वर्गांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आज हॉटेल व्यावसायिकांवर येऊन ठेपला आहे.
सकारात्मक निर्णय घेऊ-आयुक्तांची प्रतिक्रीया !
यासंदर्भात चंद्रपूर एक्सप्रेस ने शहर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सदर निर्णयावर लवकरच सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन यावेळी भ्रमणध्वनीवरून बोलताना दिले. पर्यटन विभागाच्या निघालेला आदेश यावर त्यांना विचारले असता त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया दिली.