मग कोरोनाच्या या लक्षणासाठी जबाबदार कोण ?

एकीकडे कोरोना आजार तर दुसरीकडे वाढत्या धुळीने चंद्रपूरकर झाले बेजार!

चंद्रपूर,12 ऑक्टोबर:कोरोना बाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ, वाढती धुळ आणि प्रदुषण चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या मुळावर बसलेले आहेत. शहरामध्ये आज कोणताही रस्ता बघा त्याठिकाणी डागडुजीचे काम सुरू आहे. मग ती मनपाच्या अधिनस्थ असलेली शहरातील अमृत योजना असो, मुख्य रस्त्यांची डागडुजी असो, सा.बां. विभागाचे अंतर्गत येणारे कामे असो की राज्य महामार्ग किंवा केंद्र महामार्ग चे काम असो शहरात कुठे ना कुठे चालू असलेले हमखास बघायला मिळतात. लांबत असलेल्या या रस्त्यांच्या कामामुळे शहरामध्ये धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे आज सामान्य माणूस बेजार झाला आहे. एकीकडे कोरोनाची भिती, कोरोना आजाराचे लक्षण हे थोड्या बहुत प्रमाणात या धुळीमुळे होत आहेत. या धुळीवर नियंत्रणाची जबाबदारी ज्यांची आहे तो विभाग मात्र निद्रावस्थेत आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या निकालात राज्यात प्रथम तर देशात चौथ्या क्रमांकावर आलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे शहराची अवस्था वेगळेच काही सांगत आहे. एकीकडे मुलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात न मिळणाऱ्या चंद्रपूर शहरात वाढल्या कोरोना बाधितांची संख्या नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला असून दुसरीकडे आता नागरिक वाढत्या धुळीच्या त्रासाने बेजार झाले आहेत, जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या चंद्रपूर शहरात धुळीचे प्रदूषण दिवसोंदिवस वाढतच आहे.

शहरातील कमी जास्त सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्याची नवीन कामे सुरू होत नाहीत, जी कामे सुरू झाली, ती अनेक दिवस रखडत आहेत. या सर्व बाबींचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीला वातावरणात मोठ्या प्रमाणात धुलीकण मिसळत असून, याचे प्रदूषण चंद्रपूरकरांच्या आरोग्यालाच घातक ठरू लागले आहे,

निकृष्ट रस्त्यांची कामे, रस्त्याच्या कडेला टाकलेली माती यामुळे शहरात आता वाढते प्रदुषण व धुळ नागरिकांच्या आरोग्याला धोका ठरत आहे. शहरातील नागपूर रोड असो,मूल रोड असो किंवा दाताळा रोड असो शहरात कुठेही फिरले तर अंगावर धुळीचा थर साचतो.या धुळीमुळे शहरातील नागरिक व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.

ज्यांना धुळीची एलर्जी आहे, त्यांच्यासाठी तर हा प्रकार अतिशय त्रासदायक ठरत आहे.या धुळीचे लोटचे लोट नाकातोंडात जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यला एक प्रकारे धोकाच निर्माण झाला आहे.शहरातील कस्तुरबा रोड व महात्मा गांधी रोड या दोन प्रमुख मार्गावरील व्यावसायिक व नागरिक ही अतिशय त्रस्त झालेले आहेत.या व्यावसायिकांवर दिवसातील तीन वेळा साफसफाई करण्याची वेळ येऊन ठेपत आहे.अशीच स्थिति शहरातील इतर भागातही झाली आहे.

एकंदर शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. शहरातील सार्वजनिक रस्त्यांची नियमित सफाई होत नसल्यानेही धळ वाढत आहे. त्याचबरोबर शहरातील काही भागात रस्त्यांची कामे अर्धवट झाली आहेत. रस्त्यावर खड्डे खोदून त्यातील माती रस्त्याच्या कडेला टाकण्यात आली, वाहनांच्या वर्दळीमुळे ही माती हवेत मिसळून धुळीचा त्रास वाढत चालला आहे. वाढत्या धुळीमुळे नागरिकांना घराबाहेर पडतानाच काळजी घ्यावी लागत आहे.मागील काही महिन्यांपासून हा त्रास नागरिकांना अधिक सहन करावा लागत आहे,

नागरिकांना कान, नाक, घसा, श्वसन, फुफ्फुसाचे विकारही या धुळीमुळे जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या धुळीवर व चंद्रपूर शहरातील वाढत्या प्रदुषणावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.मुलभूत सुविधा मिळविण्याबरोबरच चंद्रपूर महानगरपालिकेने आता धुळीच्या त्रासापासून सुटका करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

आज शासकीय विभागातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी कोविड-१९ चे कारण समोर करून आपण किती व्यस्त आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु कोरोना व्यतिरिक्त ही ज्या आवश्यक बाबी आहेत, त्याकडे या विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे समस्या आणखी गंभीर होत आहे. याकडे मात्र त्या-त्या विभागातील कर्मचारी-अधिकारी यांचे होणारे दुर्लक्ष ही बाब ही अत्यंत भयानक आहे. फक्त मास्क लावला नाही म्हणून ५०० रूपयांचा दंड आकारून आपले कर्तव्य बजावले अशी फुशारकी मारणारा मनपा चा कर्मचारी-अधिकारी वर्ग यांनी त्यांच्या अखत्यारीतील स्वतःची जबाबदारी ओळखावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

“त्या”मृत्यूस जबाबदार कोण ?

नुकतेच दोन दिवसांपूर्वी मुल रोड वर खोदून ठेवलेल्या खड्यामुळे एका निरपराधाचा अपघातात उपचारादरम्यान जिव गेला. या अपघाताचे वृत्त सर्वप्रथम चंद्रपूर एक्सप्रेस ने प्रकाशित केले होते. दुर्देवाने अपघातात हात गमावलेल्या त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी आपली “चौकटी”तील प्रतिक्रीया दिली होती. मास्क लावून आपल्या सुरक्षेसह जाणाऱ्या या व्यक्तीच्या मृत्युला जबाबदार असलेले कंत्राटदार व संबंधित अभियंते यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कां बरे दाखल करण्यात येवू नये. कोरोनामुळे बेजार झालेले सामान्यजण आज महत्वाच्या कामासाठीचं घराबाहेर पडत आहेत, त्यात ही त्यांना रस्त्यावरील खड्यांना वाचवून व धुळीपासून स्वतःचा बचाव करीत मार्गक्रमण करावे लागत आहे. एकीकडे कोरोना आजार तर दुसरीकडे वाढत्या धुळीने चंद्रपूरकर झाले बेजार अशी स्थिती आज उद्भवली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here