वनमंत्री राठोड यांच्याशी केली चर्चा
चंद्रपूर : राजुरा, विरूर वनपरिक्षेत्रात नरभक्षी वाघाने गेल्या बावीस महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. आजवर आठ शेतकऱ्यांना वाघाने ठार केले. या नरभक्षी वाघाला गोळ्या झाड्याव्यात, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भातील शनिवारी त्यांनी वनमंत्री राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली.
राजुरा व विरुर वनपरिक्षेत्रात मागील २२ महिन्यांपासून नरभक्षी वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. यात आठ निष्पाप शेतकऱ्यांचा बळी गेला. तीन शेतकऱ्यांना जखमी केले. त्यानंतर वनविभागाने या वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. दीडशेच्या आसपास कॅमेरे या परिसरात लावले. वनकर्मचाऱ्यांचे पथक दिवसरात्र नरभक्षी वाघाचा शोध घेत आहेत. मात्र, अजूनही वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले नाही. जवळपास २१ गावे या वनपरिक्षेत्रात येतात. या भागातील मुख्य व्यवसाय शेती आहे. सध्या खरीपाचा हंगाम सुरू आहे. या क्षेत्रात कापूस, धान, सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. वाघाच्या दहशतीत शेतकरी घाबरलेल्या स्थितीत आहेत. जीव मुठीत घेऊन शेतकरी कामे करीत आहेत. वाघाला जेरबंद करण्यासाठी काही दिवसांपासून वनविभागाने पथके तयार केली. मात्र, वनविभागाच्या तावडीत नरभक्षी वाघ सापडला नाही. मागील दोन ते तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या मोहिमेत वनविभागाला स्पेशल अपयश आले आहे. दरम्यान, शनिवारी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्य वन संरक्षक प्रवीण कुमार यांच्याशी बैठक घेतली.
त्यानंतर वनमंत्री राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. या चर्चेत त्यांनी राजुरा वनपरिक्षेत्रातील नरभक्षी वाघाने आजवर घेतलेल्या बळींची माहिती दिली. या नरभक्षी वाघाला गोळ्या झाडा अशी मागणी त्यांनी चर्चेत केली.
यावेळी ज्येष्ठ विनोद दत्तात्रय, अल्पसंख्याक कमिटीचे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, ओबीसी कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमाकांत धांडे यांची उपस्थिती होती.