जिल्ह्यात 31 ऑक्टोंबर पर्यंत कलम 144 लागू : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर, दि.3 ऑक्टोंबर: चंद्रपूर जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू असणार आहे. जिल्ह्यात दिनांक 1 ते 31 ऑक्टोबर पर्यंत आदेश लागू केले आहे. कोरोनाच्या काळात सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवता येणार आहे. तथापि, औषधांची दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. तसेच 5 ऑक्टोंबर पासून हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के ग्राहकांच्या क्षमतेने सुरू करता येतील. नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे तसेच जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

या बाबींना मनाई असणार :

सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टीट्युट या बंद राहतील. तथापि, ऑनलाईन, अंतराचे शिक्षणास परवानगी राहील. चित्रपट गृहे, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर (मॉल्स व मार्केट कॉम्लेक्समधील) बार, सभागृह, असेंब्ली हॉल यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील.

रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नुसार चालू राहील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील.

सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखु इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात येत आहे. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. तथापी तेथील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरू, पुजारी यांना करता येतील. वय वर्षे 65 वरील व्यक्ती,  दुर्धर आजार असणारे नागरिक अर्थात पर्सन विथ कोमोरबिडिटीस, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता इतर कारणास्तव बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील.

या बाबींना परवानगी राहील:

सर्व हॉटेल व लॉजिंग चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. तथापि शासनाने निर्धारित केलेली आदर्श कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच, व्यक्ती व वस्तू यांच्या आंतरजिल्हा हालचालींवर कोणतीही बंधने राहणार नाहीत. अशा हालचालींसाठी वाहने आणि त्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र परवानगी, मान्यता, इत्यादी परवान्याची  आवश्यकता असणार नाही.

खाजगी बस, मिनी बस व इतर यंत्रणेद्वारे प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी राहील. तथापि त्याकरीता परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केलेल्या आदर्श कार्य प्रणालीचे पालन करणे बंधनकारक राहील. बाह्य शारिरीक क्रियाकलाप (आऊटडोअर फिजिकल अॅक्टिव्हिटी) करण्यास कोणतेही बंधन असणार नाही.

सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूकीतील लोकांच्या हालचाली करण्यास पुढील प्रमाणे परवानगी राहील. यामध्ये टॅक्सी,कॅब,अॅग्रीगेटर फक्त अत्यावश्यक 1 अधिक 3 प्रवासी, रिक्षा फक्त अत्यावश्यक 1 अधिक 2 प्रवासी, चारचाकी फक्त अत्यावश्यक 1 अधिक 3 प्रवासी, दोन चाकी 1 अधिक 1 प्रवासी  मास्क व हेल्मेट्सह तसेच प्रवास करतांना कायम मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.

सर्व मार्केट दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7  यावेळेमध्ये  चालू राहतील. तथापि मेडिकल, औषधाची दुकाने पूर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास सदर दुकाने तात्काळ बंद करावीत.

जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आहे. तथापि प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या (संपूर्ण कार्यक्रमासाठी) मर्यादेत त्यामध्ये पाच व्यक्तींची बँड पथक, सुगम संगीत कलावंत यांची उपस्थिती ठेवून लग्नाशी संबंधित मेळावे, समारंभाचे आयोजन करणे संबंधित उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.

अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 (संपूर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन परवानगी राहील. वृत्तपत्र छपाई आणि वाटप करणेस परवानगी देण्यात येत आहे. (घरपोच वितरणासह) केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेल्या अटी व शर्ती तसेच या कार्यालयाकडील यापूर्वी दिलेल्या अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी देण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सेतु केंद्र, महा-ई सेवा केंद्र व आधारकेंद्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेकडील आदेशामधील अटी व शर्तींन्वये चालू ठेवण्यास परवानगी राहील. जिल्ह्यातील इंधन पंप, औद्योगिक आस्थापना व सर्व वैद्यकीय आस्थापना पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी आहे.

ऑक्सीजन उत्पादन व वाहतूक करणार्‍या वाहनांच्या हालचालीस राज्यात आणि राज्याबाहेर कोणत्याही प्रकारचे वेळेचे बंधन असणार नाही. याबाबत सक्षम प्राधिकारी हे वहन करणाऱ्या वाहनांच्या विनाअडथळा वाहतुकीची दक्षता घेतील तसेच ऑक्सिजनच्या उत्पादन आणि पुरवठ्यावर कोणतेही निर्बंध असणार नाही.

दिनांक 5 ऑक्टोंबर पासून हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट त्यांच्याकडील ग्राहकांच्या बैठक व्यवस्थेचा 50 टक्के इतके क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी राहील. तथापि त्याकरिता पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केलेल्या आदर्श कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक राहील.अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर यांनी अन्य कोणत्याही विशिष्ट, सामान्य आदेशाद्वारे परवानगी देण्यात आलेली कृती करण्यास परवानगी राहील.

नियमांचे पालन न केल्यास कारवाई होणार:

सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे, तेथे असताना तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 500 रु दंड आकारण्यात येईल. जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थुंकणेस मनाई असून, थुंकल्यास 500 रु दंड आकारण्यात येईल.

दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी. तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत येत आहे. सदर आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु.500/- दंड आकारण्यात येईल. ग्रामीण भागात दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रुपये 1 हजार दंड व ग्रामीण भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याची  कारवाई करण्यात येईल. सदर आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रुपये 1 हजार दंड व दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रुपये 2 हजार दंड  आकारण्यात येईल. तसेच तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना 3 दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान 3 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात सदर आदेशाचे काटेकोर पणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत करण्यात येईल.

जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

कामाच्या ठिकाणी पुढील निर्देशांचे पालन करणे बंधनकारक :

शक्य असेल त्या ठिकाणी घरातुन काम करण्यास प्राधान्य द्यावे. कामाच्या आणि व्यवसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये कामाच्या ठिकाणी, मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायीक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने विभागून द्याव्यात. थर्मल स्क्रीनिंग, हँडवॉश, सॅनिटायजर यांची एन्ट्री पॉईंट व एक्झिट पॉईंटवर व्यवस्था करावी.

कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाच्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे.औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सट्टीचे वेळी, कामावर येतांना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

आरोग्य सेतु अॅपचा वापर :

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शासकीय कार्यालयात तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य सेतू अॅपचा वापर करणे आवश्यक राहील. तसेच हे अॅप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी अद्ययावत करावी.

सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविण्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी. सदरचा आदेश दि.1 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर या कालावधीकरिता संपूर्ण चंद्रपुर जिल्ह्याचे हद्दीत लागु राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here