चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील वीस दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या तीन पटीने, मृत्यू दर सहापटीने वाढला आहे. एकंदरित कोरोनाची समूह संसर्गाकडे वाटचाल सुरू आहे. प्रशासनाने लॉकडाउनसाठी सादर केलेला प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आहे. त्यामुळे लॉकडाउनचा निर्णय काही दिवस पुढे गेला आहे. लॉकडाउन झाले नाही म्हणून आनंदोस्तव साजरा करणारेही अनेकजण आहेत. जिल्ह्यातील भयावह स्थिती बघता स्वत:ची काळजी स्वत: घेणे, हाच एकमेव पर्याय झाला असल्याचा बोध सर्वांनी घेणे गरजेचे आहे.
केंद्र शासनाने २४ मार्चला २१ दिवसांची टाळेबंदी लावली. त्यानंतर १४ एप्रिलपासून १९ दिवसांचा टाळेबंदीचा दुसरा टप्पा लागूू केला. याकाळात राज्यातील सर्वच जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण आढळले. परंतु चंद्रपूर जिल्ह्यात याचा शिरकाव झाला नाही. २ मे रोजी जिल्ह्यात पहिल्या कोरोनाच्या रुग्णाची नोंद झाली. पहिले शंभर रुग्ण होण्यासाठी तब्बल बत्तीस दिवस लागले.
२ जुलै रोजी चंद्रपुरात १०२ कोरोना रुग्णांची नोंद होती. ३१ जुलै रोजी रुग्णसंख्या ५२५ झाली. पाचशे रुग्ण होण्यासाठी तब्बल नव्वद दिवसांचा कालावधी लागला. याकाळात टाळेबंदी शिथिल झाली. अनेक निर्बंध उठले. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात होती. त्यानंतर मात्र चौदा दिवसांतच रुग्णसंख्या दुप्पट झाली. १४ ऑगस्टला एक हजार २९ रुग्ण संख्या झाली. त्यानंतर केवळ अकरा दिवसांत म्हणजे २५ ऑगस्टपर्यंत कोरोनाच्या रुग्ण संख्येने १५७१ चा आकडा गाठला. त्यानंतर स्थिती आणखी भयावह झाली. २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या सहा दिवसांत एक हजार ३७४ रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यात आतापर्यंत २८ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला.
एकंदरित जिल्ह्यातील कोरोना वाढीचा आणि मृत्यूचा आलेख बघता प्रत्येकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. अत्यावश्यक काम असल्यास घराबाहेर पडावे. त्यासोबतच सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा नियमित वापर करून स्वत:ची काळजी स्वत: घेणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही, एवढे मात्र निश्चित.