चंद्रपूर : कोरोना विषाणूने मोठ्या प्रमाणात थैमान मांडले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था डबघाईस येत आहे. चंद्रपूर येथे आधी जवळपास चार वेळा लॉकडाऊन करण्यात आले. परंतु आता मात्र व्यापारी वर्ग व इतर क्षेत्रातून लॉकडाऊन कारण्यासंबधी नकाराथता दर्शवित आहेत. आधी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय व्यापारी व लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन अनलॉक च्या केंद्र व राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार लॉकडाऊन करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्यात.
यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर राखीताई कंचर्लावार, चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, उपमहापौर राहुल पावडे, रा. कॉ. शहर अध्यक्ष राजीव कक्कड, काँग्रेस जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, नगरसेवक रवी आसवानी, नगरसेवक संजय कंचर्लावार, कापड असो. विनोद बजाज, रेडी असो. दिनेश बजाज, चेंबर ऑफ कॉमर्स हर्षवर्धन सिंघवी, सदानंद खत्री, किराणा व्यापारी असो. रामजीवन परमार, पिंटू मंत्री, एम. आय. डी. सी अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, छोटे व्यापारी असो. मेनन यांची उपस्थिती होती.
देशात मार्च अखेर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पाच महिन्यात अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. गरीब मध्यमवर्गीय, लहान मोठे व्यापारी, उद्योग सर्वांची प्रचंड आर्थिक कुचंबना होत आहे. या पाच महिन्यात कोरोना प्रादुर्भावित जनमानसात सर्व माहिती, घ्यावयाची काळजी,एकमेकांपासून अंतर राखून व्यवहार बैठका घेत याबाबत सर्व जनजागरण झाले आहे. मात्र कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता शासना व लोकप्रतिनिधी देखील संभ्रमात आहेत. लॉकडाऊन वाढवावे कि वाढवू नये, एकीकडे वाढती रुग्णसंख्या तर दुसरीकडे सर्वस्तरावर भीषण आर्थिक संकट या पाश्वभूमीवर सर्वच स्तरावरील लोक फार त्रस्त आहेत. कोरोना प्रादुर्भाव व त्यावरील उपाययोजनांचे मोठ्या प्रमाणात जनजागरण असले तरी जिल्हाभर तालुका स्तरापर्यंत मोक्याच्या ठिकाणी जागृकतेबाबत मोठे फलक लावावे व अनलॉक च्या केंद्र व राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार त्रस्त जनतेला दिलासा देत आधी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय व्यापारी व लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन लॉकडाऊन करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्यात.